Friday, 5 June 2020

योग विज्ञान भ्रामरी प्राणायाम भाग 3


Sunday, 12 April 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
          (कान,नाक,घसा तज्ञ)

भ्रामरी प्राणायाम भाग 3
भ्रामरी प्राणायाम मुख्यत्त्वे दोन मुलभूत तत्त्वांवर अवलंबून आहे.
१. नाद (आवाज, ध्वनी), २. कंपन (Vibration)
१. नाद - भ्रामरी प्राणायामात जो ध्वनी निघतो तो अनुक्रमे पूरकाच्या वेळी (नरभ्रमराप्रमाणे) निघणारा आवाज मृदू टाळू (Soft Palate) च्या कंपनामुळे निर्माण होतो व रेचकाच्या वेळी (मादी भ्रमरीप्रमाणे) निघणारा आवाज हा नाकाच्या मागे निघतो व तो ओंकारातील "म्" काराप्रमाणे असतो. पूरकाच्या वेळी निघणारा आवाज हा जास्त वारंवारतेचा (High Frequency) व तारेप्रमाणे असतो. अशा आवाजाचा परिणाम विशुद्धी व आज्ञा चक्राच्या सक्रियतेवर होतो. तसेच रेचकाच्या वेळी निघणारा आवाज हा कमी वारंवारतेचा (Low Frequency) जो "म्" काराप्रमाणे असतो. “म्" कार हा ओंकाराचा तिसरा भाग असून यास आत्म्याची प्राज्ञ अवस्था असे संबोधले असून ही एक सुषुप्तीच स्थिती असून यामध्ये मनास शांत वाटते. हा एक नादानुसंधानाचा भाग असून याचा अष्ट चक्रांवर चांगला परिणाम होतो.वेगवेगळ्या आवाजांचा (Frequencies) वेगवेगळ्या चक्रावर परिणाम होतो. जसे ड्रमच्या आवाजाचा परिणाम मुलाधार चक्रावर, हवेचे वाद्य , जसे बासरी, शहनाई यांचा परिणाम स्वाधिष्ठान ते मणिपूर चक्रावर होतो, मेटॅलिक साऊंड (धातूवाद्य) जसे टाळ,
चिपळ्या यांचा परिणाम मणिपूर ते अनाहत चक्रावर होतो. तंतूवाद्य जसे विणा, सतार यांचा परिणाम अनाहत चक्रावर तर घंटी किंवा पाण्याच्या आवाजाचा परिणाम विशुद्धी व आज्ञा चक्रावर होतो. सर्वच वाद्यांचा परिणाम सहस्त्रार चक्रावर होतो. फार मोठ्या कर्कश्य आवाजाचा उदा. डि.जे., बाँब यांचा परिणाम विकृत होऊ शकतो.
२. कंपन (Vibration) - भ्रामरी प्राणायामामध्ये जे कंपन होते त्याचा मेंदूवर दोन प्रकारे परिणाम होतो.
अ) रासायनिक (Chemical), ब) विद्युत तरंग (Electrical Waves)
अ) रासायनिक परिणाम - हे रसायन मेंदूमध्ये कार्यरत असून ते दोन मज्जापेशी (Neurons) मध्ये संदेश वहनाचे कार्य करतात. यांना न्यूरोट्रान्समीटर (Neurotransmitter) असे म्हणतात. भ्रामरी प्राणायामातील कंपनामुळे काही न्यूरोट्रान्समीटर मध्ये वाढ होते. जसे डोपामिन (Dopamine), एन्डॉर्फीन (Endorphin), सिरोटोनिन
(Serotonin), गॅबा (GABA -Gama amino butyric acid) इत्यादी.
     डोपामिन (Dopomine) मुळे साधकास आल्हाददायक, उत्साहवर्धक व आनंददायक वाटते. एखादी स्पर्धा जिंकल्यानंतर, मुका घेतल्यानंतर, लॉटरी जिंकल्यानंतर किंवा स्तूती ऐकल्यानंतर जसे वाटते तसे रक्तातील डोपामिनचे प्रमाण वाढल्यानंतर वाटते. या रसायनाला Reward Molecule असेही म्हटले आहे.
    एन्डॉर्फीन (Endorphin) - हे रसायन मेंदूमध्ये जास्त प्रमाणात व्यायाम केल्यानंतर किंवा एरोबीक एक्सरसाईज (Aerobic Exercise ) केल्यानंतर जास्त प्रमाणात तयार होतो. भ्रामरी प्राणायामातही ह्या रसायनाची वाढ होते. हे रसायन पियुषी ग्रंथी व हायपोथैलेसमधून तयार होते.त्यामुळे आनंद वाटतो.म्हणून यास आनंद रसायन  (Bliss Molecule) असे ही म्हणतात. हे रसायन नैसर्गिक वेदनाशामक म्हणूनही काम करते. एन्डॉर्फीनमुळे वजनही कमी होते. कारण ते भूकेवर नियंत्रण आणते व सात्विक
अन्न खाण्यासाठी इच्छा निर्माण करते. जेव्हा एन्डॉर्फीनची शरीरात कमतरता असते, त्यावेळी उदासिनता, चिंता, झोपेची
समस्या, व्यसनाधिनता. मूड जाणे, भावनावश वर्तन करणे, स्वत:ला गौण समजणे, असे विकार होतात. भ्रामरी प्राणायामामध्ये एन्डॉर्फीनची वाढ होते, त्यामुळे वरील सर्व
लक्षणे दूर होतात व जीवनात रस निर्माण होतो.
          सिरोटोनिन (Serotonin) - याचे रासायनिक नाव (5 HT - Hydroxy Tryptamine) असून यास (Confidence Molecule) असेही म्हणतात. या रसायनामुळे मन लावून, आत्मविश्वासाने, धडाडीने काम पूर्ण करून दाखविण्याची जिद्द त्याच्यामध्ये तयार होते. त्यामुळे उदासिनता कमी होते. तसेच सिरोटोनिनमुळे न्यूरोजेनेसिस (Neorogenesis) म्हणजे नवीन मज्जापेशींची वाढ होते. भ्रामरी प्राणायाम केल्याने ऑपरेशन नंतर नैसर्गिकरित्या जखम लवकर भरून येते. शरीरात दुरुस्ती (Healing)
होण्यास मदत होते.
      गॅबा (GABA- Gama amino butyric acid) - हे मज्जापेशींचे काम कमी करते. दोन पेशींमधील संवेदनांचे समतोल राखणे. त्यामुळे शांतता, शितलता व स्थिरतेचा
परिणाम दिसून येतो. गॅबाचे प्रमाण योगासनाने, ध्यानाने व शितलीकरणाने वाढविता येते. भ्रामरी प्राणायामा मध्येही मन याच्यामुळेच शांत होते. याच्यामुळे उदासिनता दूर होते,
शांत झोप लागते, स्मरणशक्ती वाढते तसेच पार्कीनसन्स रोगामध्येही भ्रामरी प्राणायामाचा फायदा होतो.

Sharadyogvigyan.blogspot.com

4 comments:

  1. Excellent scientific information sir

    ReplyDelete
  2. 👍 Informative, based on medical ground. Right application of Medical field in Yoga. Golden combination. 🙏

    ReplyDelete
  3. ओम नमो भगवते वासुदेवाय
    नमस्कार
    आपणाला खूप खूप धन्यवाद आपण पद्धतशीरपणे अनेक योग अभ्यासांची शरीर प्रक्रिया आणि शरीर रचना शास्त्र आणि वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीने उपयुक्त माहिती आपण दिली आहे
    आपल्या संस्कृतीच्या विषयी विज्ञान वादी आधुनिक पिढीमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल
    धन्यवाद नमस्कार नमो नमः

    ReplyDelete