Friday, 8 May 2020

योग विज्ञान प्राणायाम भाग ४

7th May 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
प्राणायाम भाग  ४
      रेचक करताना हवेला बाहेर जाण्यास अवरोध केल्याने हवा सावकाश बाहेर सोडता येते. रेचकाचे प्रमाण पुरकापेक्षा दुप्पट असणे योगशास्त्राच्या दृष्टीने महत्वाचे असते.त्यामुळे फुफ्फुसातील हवा जास्तीत जास्त बाहेर सोडता येते.नंतरच्या पुरकात येणारी शुद्ध हवा जास्तीतजास्त घेता येते. कर्बाम्लवायूचे प्रमाण सहन करण्याची क्षमता  वाढल्यामुळे कर्बाम्लवायू काही प्रमाणात वाढला तरी अपाय न होता मज्जासंस्था शांत होते. असे आधुनिक विज्ञानही सांगते.रेचक जास्तीत जास्त वेळ केल्याने चिकाटी,धैर्य व संयम वाढण्यास मदत होते.मनाची अधीरता ,अस्थिरता कमी कमी होत जाते.निश्चय वाढतो,स्थिरता वाढते, मनोकायिक ताण, चिंता दूर होतात व मन शांत होत गेल्याने भावनांचा उद्रेक होत नाही.त्यामुळे हृदयगती व रक्तदाबही वाढत नाही व तो नियंत्रित राहतो.
     सामान्य श्वसनात छाती व उदर पोकळीत जे दाब उत्पन्न होतात त्यापेक्षा अधिक तीव्रतेचे दाब प्राणायामाच्या श्वसन पद्धतीत उत्पन्न होतात.त्यामुळे छाती व उदर पोकळीत वेगवेगळ्या अवयवाचे मर्दन होऊन त्यातील रक्त संचार बदलतो.तेथील स्नायूंचे कार्य प्रभावित होते.व त्या क्षेत्रातील मज्जातंतू उत्तेजित होऊन प्रतिक्षिप्त क्रियेद्वारा अनेक स्थानिक व सार्वदेहीक बदल घडून येतात.
      प्राणायाम करीत असताना मूलबंध, उद्दीयांनबंध व जालंधरबंधाचा वापर केला जातो.या बंधाच्या वापरामुळे कुंभकाची अवस्था जास्त काळ टिकवून धरता येते आणि कुंभकाच्या अवस्थेत छाती व पोटात तीव्र दाब उत्पन्न होतो.त्यामुळे शरीरातील फुफ्फुसे,हृदय,यकृत आदी नाजूक अवयवावर विपरीत परिणाम न होता ते कार्यान्वित होतात.
     प्राणायमामध्ये कमी प्राणवायूचा वापर करून जास्तीत जास्त प्राणवायू शरीराच्या इतर कार्यासाठी उपलब्ध करून दिला जातो.प्राणायामाच्या दीर्घकाळ अभ्यासाने व त्याच्या श्वसन पद्धतीमुळे साधकास कमी श्रमात जास्त प्राण वायू उपलब्ध होतो.
      श्वसनाद्वारे आपल्या फुफ्फुसातून हवा सतत आत- बाहेर होत असते. याला वायुवीजन म्हणतात.एका मिनिटात जेव्हढी हवा आत-बाहेर होते त्याला "मिनिट वायुवीजन" असे म्हणतात.प्राणायामात जेव्हा श्वास दीर्घ परंतु अतिमंद होतो व एका मिनिटातील श्वासोच्श्वासाची गती खूप कमी होते अशा वेळी हे मिनिट वायुवीजनही खूप कमी होते.परंतु हवा बराच काळ फुफ्फुसात रहात असल्यामुळे फुफ्फुसातील प्राणवायू व कर्बाम्लवायू यांच्या आपापसातील देवांणघेवांणीच्या कार्यात फारसा फरक पडत नाही.आणि त्यामुळे श्वसन गति खूप मंद होऊनही व मिनिट वायुवीजन कमी होऊनही रक्तातील प्राणवायू व कर्बाम्लवायू यांच्या प्रमाणात कुठलेही बदल होत नाहीत.या उलट कपालभाती क्रिया व भ्रस्तिका प्राणायाम या सारख्या प्रक्रिये मधे श्वसन गती वाढून एका मिनिटातील श्वसनाची संख्या खूप वाढलेली असते.मिनिट वायूवीजन नेहमीपेक्षा खूपच पटीने वाढलेले असते.त्यामुळे काही प्रमाणात रक्तामधील कर्बाम्लवायूचे प्रमाण थोडे कमी होते .परंतु हा बदल इतक्या अल्पांशाने होतो की , त्यामुळे रक्तातील कुठल्याच इतर घटकात लक्षणीय असा बदल होत नाही.याचा अर्थ प्राणायामाच्या मंद अथवा जलद गतीच्या कोणत्याच प्रकाराचा परिणाम रक्तातील प्राणवायू,कर्बाम्लवायू अथवा आम्ल व अल्कली यांच्या संतुलनावर कसलाच परिणाम होत नाही व साम्यावस्था कायम राहते.

Sharadyogvigyan.blogspot.com
     

No comments:

Post a Comment