Saturday, 16 May 2020

योगविज्ञान प्राणायाम भाग ८

Saturday 16th May 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
प्राणायाम भाग ८
     मनाचा आणि श्वसनाचा इतका निकटचा सम्बन्ध आहे की,एकाची स्थिती बदलली की,दुसऱ्याचे स्वरूप अपरिहार्यपणे बदलते.मनात येणारे विचार,भावना,वासना याने श्वसनाची संख्या ,गती व स्वरूप बदलते.
      भयाचा विचार आला की,श्वासोच्छस्वास बंद होण्याची वेळ येते किंवा तो कांही काळ थांबतो. राग आल्यास श्वास जोरात चालतो.निराश झाल्यास मंद, लांब श्वास टाकतो.भांडण किंवा दोन हात करण्याची वेळ आल्यास श्वास कोंडला जातो.चमत्कार किंवा नवलपूर्ण घटना अनुभवली की, श्वासोच्छवास कांही क्षण बंद होतो.डोक्यात विचारचक्र किंवा टेंशन आल्यास श्वास जोरात चालतो.त्याची गती वाढते.पूर्ण समाधानाच्या अवस्थेत श्वास मंद व लयबद्ध चालतो.
      मनाला नियंत्रणात आणण्यासाठी श्वासावर नियंत्रण आणणे महत्त्वाचे आहे,म्हणजेच प्राणायाम करणे आवश्यक आहे. प्राणायामाने श्वासावर प्रभुत्व मिळविले की, त्याचा परिणाम म्हणून मनावर स्वामित्व मिळते. मनावर ताबा मिळविला की, भावना,वासना,इच्छा,विचार , कल्पना यावर नियंत्रण येते व योगी चा स्वभाव बदलतो.तो सात्विक होतो.
     मेंदूमध्ये मुख्यत्वे दोन भाग आहेत.एक मागील मागील भाग(posterior brain) जो एक स्वाभाविक भाग असून जेंव्हा जेंव्हा आपण स्वाभाविक श्वसन (अनैच्छिक किंवा जाणिवेशिवाय केलेले श्वसन, Involuntory breathing) करतो त्यावेळी मेंदूचा मागील भाग उत्तेजित होतो किंवा त्याभागात नोंद होते.जेंव्हा आपण ऐसच्छिक श्वसन किंवा जाणीवपूर्वक (Voluntary breathing) करतो. त्यावेळी मेंदूचा पुढील भाग (Frontal cortex) उत्तेजित होतो.किंवा त्या मेंदूच्या भागात त्याची नोंद होते. जाणीवपूर्वक केलेल्या श्वसनाचा परिणाम मेंदूवर फार वेगळ्या प्रकारे होतो. स्वाभाविक श्वसनामध्ये प्राणशक्ती संपूर्ण शरीरात
पसरते परंतु ती विकास,वाढ किंवा उत्क्रांती होण्यासाठी पुरेशी नसते.म्हणून प्राणायामाद्वारे प्राणशक्तीमध्ये वाढ होऊन ती विकास व उत्क्रांती होण्यासाठी पुरेशी असते.
     ऐच्छिक श्वसनाचा परिणाम फ्रँटल कॉर्टेक्स वर होतो, तो नेहमी सक्रिय राहतो.फ्रँटल कॉर्टेक्स मधून निघालेल्या आज्ञा संवेदना (motor impulses) लम्बमज्जा (Medulla Oblongata) मधील श्वसन केंद्रा कडे न जाता दुसऱ्या मार्गाने जातात.त्यामुळे फ्रँटल कॉर्टेक्स ची वाढ होते.भावनिक मेंदूचेही नियंत्रण होते.
     नाडीशोधन प्राणायमामध्ये आपण ऐच्छिक श्वसन करतो, त्यावेळी डाव्या नाकपुडीने (इडा नाडी) श्वास घेतल्यास मेंदूचा उजवा  गोलार्ध उत्तेजित होतो.तर उजव्या नाकपुडीने (पिंगळा नाडी) श्वास घेतल्यास मेंदूचा डावा गोलार्ध उत्तेजित होऊन त्याची क्रियाशीलता वाढते.जेंव्हा दोन्ही नाकपुड्या समसमान चालतात त्यावेळी दोन्ही गोलार्ध तालबद्ध व सारखेच सक्रीय होतात.
     तणावामध्ये मेंदूचा आलेख (E.E.G.) केल्यानंतर त्यामध्ये बीटा तरंग दिसून येतात.प्राणायामामुळे त्या अल्फा,डेल्टा व थिटा तरंग यामध्ये रूपांतरित होतात ज्यामध्ये माणूस तणावमुक्त व शांत होतो तसेच तणावामुळे हृदयावर निर्माण झालेला दाबही कमी होतो.
     विज्ञानाने सिद्ध झाले आहे की,तणावामध्ये निर्माण होणारे स्ट्रेस हार्मोन्स (Adrenocortical harmones) प्राणायामामुळे कमी होतात.आणि तणावमध्ये प्रतिकार करण्याची शक्ती वाढते. मेंदूमध्ये अल्फा तरंगाचे प्रमाण वाढते त्यामुळे शांतता व स्थिरता वाढते. कमी ऑक्सिजन मध्ये फुफ्फुसाच्या पूर्ण क्षमतेने काम करण्याचे कौशल्य प्राप्त होते,मानसिक शक्ती वाढते.दैनंदिन जीवनात जाणिवेने काम करण्याची क्षमता वाढते. हृदय व श्वसनसंस्था यांची कार्यक्षमता सुधारते.रोगप्रतिकार शक्ती वाढते.तसेच ऐच्छिक श्वसनामुळे (conscious breathing) मनावर शांत परिणाम होतो.

Sharadyogvigyan.blogspot.com
   
       


No comments:

Post a Comment