Tuesday, 5 May 2020

योग विज्ञान प्राणायाम भाग २

योग विज्ञान शृंखला* 🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
प्राणायाम भाग २
        श्वास घेते वेळी म्हणजेच पुरकाच्या वेळी श्वास हवा फुफ्फुसात जाण्यासाठी श्वास पेशींना प्रयास करावा लागतो. म्हणून ही सक्रिय ( Active) क्रिया आहे,तर रेचक ही क्रिया निष्क्रिय (passive) आहे , कारण हवा बाहेर येण्यासाठी श्वासपेशींना प्रयास करावा लागत नाही. प्राणायामात रेचकाची क्रिया ही पुरकपेक्षा जास्त हळुवार आणि दीर्घकाळ चालते. ही हळुवार चालणारी रेचकाची क्रिया मोठा मेंदू (cerebral cortex) याच्या नियंत्रणाखाली चालते. मोठा मेंदू हा लहान मेंदूमधील श्वसन केंद्रावर अवरोध निर्माण करतो. त्यामुळे ती रेचक क्रिया हळुवार होते. हा अवरोध भावनांशी संबधित असलेल्या हैपोथॅलॅमस वरही पडतो. त्यामुळे रेचकाच्या वेळी शिथिलता आणि शांती भाव प्रदान होतो. म्हणून प्राणायामात पूरक आणि रेचकाचे प्रमाण १:२ असे ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.
       कुंभकात ऑक्सिजनचे जास्तीत जास्त शोषण होते. तसेच स्नायूतंत्रास शरीरात वाढलेल्या कार्बनडाय ऑक्साईडच्या वाढलेल्या स्तराशी सहनशील होण्याचे प्रशिक्षण मिळते. जेंव्हा मेंदूतील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण कमी होते त्यावेळी दीर्घ श्वास चालू असतो.
       कुंभकाचा परिणाम मेंदूवर होतो. त्यामुळे शरीरातील अनैच्छिक क्रियांवर नियंत्रण प्राप्त होते. ज्याप्रमाणे कांही योगी हृदयाच्या गतीवर नियंत्रण आणू शकतात. त्याची गती कमी करण्यास व वाढवीण्यास सक्षम असतात. हृदय हे एक असे अवयव आहे त्यावर मेंदूमधील हैपोथॅलॅमस चे नियंत्रण असते. याचाच अर्थ एक निष्णात हैपोथॅलॅमसवर नियंत्रण आणू शकतो.त्यामुळे हृदयक्रिया,शरीर तापमान तसेच पचनसंस्था यावर नियंत्रण प्राप्त होते,ज्या अनैच्छिक क्रिया आहेत.
       जेंव्हा केवल कुंभक लागतो त्यावेळी भूमध्यामध्ये प्रकाश बिंदू तयार होऊन तो चिदाकाशामध्ये पसरतो. मेंदूचा अग्रभाग ज्योतिर्मय वाटतो. ज्याप्रमाणे सकाळच्या वेळी उजाडते. आपल्या मेंदूतील एकावेळी एकच गोलार्ध काम करीत असतो.परंतु केवल कुंभकात दोन्ही गोलार्धामधील पातळ पडदा कॉर्पस कैलॉसम मधून संवेदना दोन्हीकडे जातात.त्यामुळे दोन्ही गोलार्ध काम करू लागतात.सर्वच केंद्र उत्तेजित होतात.
       पूरक,कुंभक व रेचकाचे प्रमाण १:२:२ किंवा १:४:२ असे ठेवून प्राणायाम केल्यास एक मिनिट प्राणायामाच्या वेळी घेतली गेलेली एकूण हवा ही एक मिनिटांचे सामान्य श्वासनात घेतल्या जाणाऱ्या एकून हवेपेक्षा कमी असते. त्यामुळे प्राणायामात आपण जास्त प्राणवायू घेतो किंवा मिळतो हे खरे नाही.मात्र प्राणायामात दीर्घ श्वास घेतला गेल्याने व नंतर कुंभक केल्याने फुफ्फुसामधील जास्तीत जास्त वायूकोष नेहमीपेक्षा ताणले जातात आणि रक्तातील कर्बामलवायू व वायुकोषातील प्राणवायू यांची अदलाबदल होण्यास भरपूर वेळ मिळतो
प्राणायामात पूरक रेचक करताना शांतपणे,हळुवार,सहजतेने व कोठल्याही प्रकारची घाई न करता करावे. श्वसनाचा जोर (force) सर्व अवस्थांमध्ये एकसारखा असावा व त्यावर नियंत्रण असावे. पूरक रेचक शांतपणे संपले पाहिजे. काहींना पुरकाचे शेवटी जोराने श्वास घेऊन छाती फुगविण्याची व रेचकाच्या शेवटी पोटाने स्नायू जोराने आकुंचन करण्याची सवय असते. असे करणे कटाक्षाने टाळले पाहिजे. त्यामुळे कुंभकाचे प्रमाण आणि पुढील आवर्तन बिघडण्याचा संभव असतो. प्राणायमच्या हॄदयक्रियेवरिल परिणामांचे परीक्षण केले असता असे दिसून येते की,कपालभाति व भ्रस्तिका प्राणायाम करताना रक्तदाब वाढतो. तर भ्रामरी,उज्जायी यामधे तो कमी होतो.त्रिबन्धात्मक कुम्भकाचा वापर केल्यास रक्तदाबातील बदल अधिक तिव्रतेने होतात.

sharadyogvigyan.blogspot.com

No comments:

Post a Comment