Sunday, 31 May 2020

योग विज्ञान ध्यान भाग ३

Monday 25 may 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
  ध्यान भाग ३
कल्पनादर्शन ध्यान :
कल्पना दर्शन ध्यान म्हणजे समोर प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या दृष्याची कल्पना करून बंद डोळ्यांनी ते दृष्य पहायचे, अश्या प्रकारची कल्पना करता येणे हे बहुदा फक्त माणसालाच शक्य आहे. कल्पनादर्शन ध्यानासाठी वापरात येणारी दृश्ये ही आपल्या स्मृतीशी संबंधित मानसिक प्रतिमा असाव्यात,
      कल्पनादर्शन ध्यान म्हणजे अशाच एखाद्या प्रसंगाची किंवा दृष्याची कल्पना करुन ते पाहणे, तसा आवाज अनुभवणे, सुगंधाची, ध्वनीची, स्पर्शाची कल्पना करणे. बऱ्याचदा आपण भविष्यातील संकटाचे किंवा पूर्वी घडून गेलेल्या अपमानास्पद किंवा भांडणाच्या प्रसंगाचे स्मरण करतो त्यावेळी नकळत त्याचे कल्पनादर्शन ध्यान होत असते. त्यावेळी आपल्या शरीरात युध्दस्थितीतील रसायने पाझरतात. नकळत आपला रक्तदाब, रक्तातील साखर, हृदयाची धडधड, श्वासाची गती. स्नायुवरील ताण वाढतात. शरीरात थकवा येतो, मन अस्वस्थ होते. ही स्थिती बदलायची असेल तर आपल्या शरीरात शांतता स्थितीतील रसायने पाझरायला हवीत. आणि त्यासाठी आपल्या मनाला शांत करणारे एखादे आनंददायी दृश्य, इश्वराची मूर्ती, देवाचे, गुरुचे, निसर्गाचे किंवा प्रिय व्यक्तीचे रुप कल्पना करुन पहायचे हेच कल्पनादर्शन ध्यान होय.
         आपला मेंदू एखादी प्रत्यक्ष कृती आणि त्या कृतीची कल्पना म्हणजेच फक्त विचार यामध्ये फरक जाणत नाही. EMG म्हणजे इलेक्ट्रोमायोग्राफी याच्या मदतीने स्नायूतील इलेक्ट्रीक हालचाल मोजता येते. एका प्रयोगानुसार प्रत्यक्ष धावतांना आपल्या पायाच्या ठराविक स्नायूमुळे इलेक्ट्रीक हालचाल वाढते. गंमत म्हणजे प्रत्यक्ष धावले नाही, परंतु धावत आहेत अशी कल्पना जरी केली, तरी त्याच स्नायूमधील इलेक्ट्रीक हालचाल वाढलेली दिसते. डॉ. श्रीनिवास पिल्लाई यांच्या मते आपण एखाद्या कृतीची कल्पना तसे दृश्य पहातो. त्यावेळी आपल्या मेंदूतील पोस्टेरिअर परायटल कॉर्टेक्स
(Posterier parietal Cartex) हा भाग सक्रीय होतो. दृष्टी, त्वचा आणि इतर ज्ञानेंद्रिये या कडून माहिती घेवून त्यानुसार आवश्यक कृतीची रुपरेषा तेथे तयार होते. त्यानुसार
मेंदूच्या इतर भागातही घडामोडी घडतात.
      एका प्रयोगात पियानो वाजवणाऱ्या माणसांच्या मेंदूचे एम.आर.आय. स्कॅनिंग केले नंतर पियानो वादकांचे दोन गट तयार केले. एका गटाला रोज एक धून दहा मिनीटे वाजवायला दिली. ज्यामध्ये त्याच्या डाव्या हाताची करंगळी अधिक वापरावी लागत होती. दीड महिना रोज दहा मिनीटे असा सराव केल्यानंतर त्यांच्या मेंदूचे पुन्हा स्कॅनिंग केले असता त्यांच्या मेंदूतील कॉर्टेक्समधील डाव्या करंगळीशी संबंधित भाग विकसित झालेला आढळला. नंतर दुसऱ्या पियानो वादकांच्या गटाला तीच धून प्रत्यक्ष न वाजवता, ते ती धून वाजवत आहेत असे कल्पनादर्शन ध्यान रोज दहा मिनीटे करायला लावले. हे वादक त्यांची करंगळी प्रत्यक्ष वापरत नव्हते. पण फक्त तशी कल्पना करीत होते. दोन महिना असे
ध्यान केल्यानंतर त्यांच्या मेंदूचे पुन्हा स्कॅनिंग केले आणि पहिल्या गटातील पियानो वादकांच्या मेंदूतील जो भाग विकसित झाला होता तोच डाव्या करंगळीशी संबंधित
भाग अधिक विकसित झाला होता.
     ह्या ध्यानाचा उपयोग सकारात्मक दृष्टिकोण वाढविन्या  साठी नक्कीच करता येतो.

sharadyogvigya.blogspot.com

योग विज्ञान ध्यान भाग २

Sunday 24 May 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा )
ध्यान  भाग २ 
एकाग्रता ध्यान   (Focused Meditation) :
हे एकाग्रता ध्यान वेगवेगळ्या प्रकारे करता येते जसे त्राटक (बिदू, ज्योती). प्रजापिता ब्रह्मकुमारी मध्ये लाल दिव्यावर मन एकाग्र केले जाते. आवाजावरही मन एकाग्र करू शकतो. जसे भ्रामरी प्राणायमामध्ये नादावर मन एकाग्र केले जाते. जो एक नादानुसंधानाचाच भाग आहे. श्वासावरही लक्ष केंद्रीत करता येते. नाम शब्द घेऊनही हे ध्यान करता येते. मंत्र ध्यान ज्यामध्ये एखादा मंत्र घेऊन मन एकाग्र करता येते. ओमकारच्या प्रतिमेवर ध्यान देऊनहीं ध्यान एकाग्र करता येते. ज्यावेळी आपण ज्योतीकडे पहात असू किवा नामस्मरण करत असू अथवा श्वासाची हालचाल पहात असू , थोड्याच वेळात मन भरकटत जाते आणि मनात विचार यायला लागतात की आपण जे काही आलंबन निवडलेले आहे त्यापासून आपले लक्ष दुसरीकडे गेले आहे. हे स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. ज्यावेळी ध्यानात येते की, आपले लक्ष दुसरीकडे गेले आहे त्यावेळी आपले लक्ष ठरवलेल्या आलंबनावर आणणे म्हणजे एकाग्रता ध्यान, ज्यावेळी आपण परत लक्ष आलंबनावर आणतो त्यावेळी मेंदूमध्ये डार्सोलेटरल प्रि फ्रंटल कॉर्टेक्स (Darsolateral Prefrontal Cortex) नावाचा एक भाग आहे ज्याला अटेंशन सेंटर (Attention Center) असे म्हटले जाते. तो सक्रिय होतो ज्यावेळी मला लक्षात येते की, मी श्वासावर लक्ष देतो आहे आणि माझे मन विचारात गेले नाही आणी  स्थिर आहे. माझा श्वास मला समजत असतो त्यावेळी तो Darsolateral prefrontal cortex उत्तेजित झालेला असतो किंवा त्याची सक्रियता वाढलेली असते आणि परत मी श्वासावर लक्ष आणतो.परत लक्ष दुसरीकडे जाते,परत आपण लक्ष श्वासावर आणतो,असे जेंव्हा परत परत घडते त्यावेळी Darsolateral prefrontal cortex मध्ये नवीन पेशींची निर्मिती होते असे आजचे न्यूरोसायन्स सांगते, आणि त्याचा परिणाम म्हणून आपण जास्तीतजास्त एकाग्र राहू लागतो.
       ध्यानाचा अजून एक फायदा आजच्या मेंदू विज्ञान ला समजलेला आहे आणि तो म्हणजे जेंव्हा आपण श्वासावर लक्ष केंद्रित करतो त्यावेळी मेंदूतल्या विचार करणाऱ्या भागाला विश्रांती मिळते,त्याला शास्त्रज्ञानी नाव दिले आहे Default mode net work . आपण शांत बसलेलो असतो त्यावेळीही आपला मेंदू शांत नसतो.त्याच्या मध्ये सतत विचार येत असतात,भूतकाळातले,भविष्यातल्या वेगवेगळ्या घटना ,आठवणी आणणे हे सतत मेंदूत चालू असते.अश्या विचाराच्या वेळी Default mode net work ला विश्रांतीच मिळत नाही.
    मेंदूच्या संशोधनामध्ये डोक्यावर अनेक इलेक्ट्रोड्स लावून मेंदुचा कोणता भाग सक्रिय नाही हे समजत. त्याच्यावरुन असे लक्षात आले की, जेंव्हा ध्यानामध्ये आपण श्वासावर लक्ष दिले तेवढा  वेळ आपन मेंदूतील विचार करणाऱ्या भागाला विश्रांति देतो. ही विश्रांति मेंदुला देणे फार आवश्यक असते.जेवढया श्वासासाठी आपण सजग होऊन मेंदूला विश्रांती देतो, त्या प्रत्येक श्वासाला गुगल कंपनीमध्ये Good Breath
असे म्हटले जाते. साधारण ५५ हजार नोकरदारांना गुगलमध्ये हे ध्यान शिकवले जाते. आणि ते असे सांगतात की, कमीतकमी एक Good Breatn हा एक तासामध्ये
घ्यावा. कारण सजग श्वासाचा परिणाम हा पुढील एक तासापर्यंत राहतो आणि मेंदूला विश्रांती मिळाल्यामुळे पुढेही तो चांगल्याप्रकारे काम करू शकतो. ध्यान ही ठराविक
वेळीच करण्याची गोष्ट नाही तर, ध्यान ही सतत अणि केव्हाही करण्याची गोष्ट आहे. म्हणून दर १ किंवा २ तासांनी हे एकाग्रता ध्यान १ ते २ मिनिटांसाठी करणे उपयोगी ठरते

sharadyogvigyan.blogspot.com

योग विज्ञान ध्यान भाग. १

Thursday 21 May 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ) 
ध्यान विज्ञान. भाग १
          ध्यानाचा संबंध इश्वर प्राप्तीसाठी, साक्षात्कारासाठी किंवा आत्मकल्याणासाठी करायची साधना असा लावला जातो. म्हणून त्याचा संदर्भ धर्म, अध्यात्म, उपासना याच्याशी जोडला जातो. भौतिकदृष्टया जर विचार केला तर ध्यानाचा परिणाम मानवाच्या शरीर, मन आणि मेंदूवर होतोच शिवाय संपूर्ण जीवनावर सकारात्मक परिणाम दिसून येतो. मागील अनेक वर्षापासून जगातील विविध देशात ध्यानाचा परिणाम शरीर, मन आणि मेंदूवर काय होतो याचे संशोधन होत आहे. एकविसाव्या शतकात ध्यानाचा मेंदूवर होणाऱ्या परिणामांचे संशोधनात बरीच प्रगति होत आहे. ध्यानाचा परिणाम मानवाच्या शरिराच्या पेशीपर्यंत होतो. ध्यानामुळे मेंदूला काही काळ विश्रांती मिळते त्यामुळे माणसाची आकलन शक्ति, स्मरणशक्ती आणि निर्णय क्षमता वाढते, भावनिक स्थिरता प्राप्त होते.
      ध्यानाचा वैज्ञानिक दृष्टीतून शरीरावर, मनावर, मेंदूवर व पेशीवर काय परिणाम होतो हे सिद्ध होत आहे आणि याचे सकारात्मक परिणाम संशोधनातून दिसून येत आहेत. ह्या ध्यानाचा सकारात्मक परिणाम व त्याचा उपयोग सामान्य लोकांना व्हावा, एवढेच नाही तर जो ईश्वराला मानत नाही अशा नास्तिकापर्यतही पोहोचायला हवे. कारण ईश्वर मानणे न मानणे हे मेंदूतून ठरत असते आणि  हे ध्यान  मेंदूसाठीच काम करत असते.
१) ध्यान सुरू केल्यानंतर शरीराकडून वापरला जाणारा ऑक्सिजन १० ते २० प्रतिशत कमी होतो. जागृतावस्थेपेक्षा झोपेमध्ये हे प्रमाण ६ ते ८ प्रतिशत कमी असते. शरीराची चयापचय क्रिया मंद होते. ध्यानामध्ये हा फरक पहिल्या तीन मिनीटातच दिसून येतो.
२) मेंदूच्या आलेखामधे (E.E.G) अल्फा लहरींचे प्रमाण वाढते. अल्फा लहरी मेंदू शांतता व रिलॅक्स स्थितीत असतांनाच दिसतात.
3)रक्तामधील लॅक्टेट (Blood Lactate) नावाचे रसायन कमी होते. रस्तामध्ये लॅक्टेटचे प्रमाण जास्त असणारी माणसे चिंतेला जास्त बळी पडतात, ध्यान सुरु केल्यानंतर ह्याचे प्रमाण दहा मिनीटात कमी होते.
       ध्यान हे घरोघरी पोहोचणे आवश्यक आहे. कारण आज मानसिक रोगांचे (Psychological disorders) वाढते प्रमाण, त्यातल्यात्यात तरुणांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येत आहे. त्यामध्ये चिंतारोग, औदासिन्य, निराशा, भिती (Phobia), ओ.सि.डी.(Obscessive Compulsive Disorder) याप्रकारचे मानसिक आजार दिसून येतात.अशा सर्व रोगामध्ये ध्यानाचा चिकीत्सा किंचा उपचार पद्धती म्हणून त्याचा उपयोग करून घेता येतो. वरील सर्व मानसिक आजारांचा त्रास कमी करून आपला विकास करून घ्यायचा असेल तर त्यासाठी "ध्यान" हा आवश्यक पर्याय आहे.
        ध्यानाचा शब्दशः अर्थ हा लक्ष किंवा (attention) हा आहे. आपण एखादी गोष्ट शिकवताना सांगतो की, ध्यान (लक्ष) देऊन ऐका. म्हणजेच ते ध्यान आहे. हे ध्यान चार वेगवेगळ्या प्रकारे करता येते. ह्या चार प्रकारचे ध्यानाचे मेंदूवर होणारे परिणामही वेगवेगळे आहेत. यात पहिला प्रकार आहे एकाग्रता ध्यान (Focused Meditation)        क्रमशः

Sharadyogvigyan.blogspot.com

Tuesday, 19 May 2020

योगविज्ञान प्राणायाम भाग ११

Tuesday 19th May 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
 प्राणायाम भाग ११
     प्राणायामाने शरीर आणि मनाचे शुद्धीकरण होते. जेंव्हा नवीन साधक रोज भस्त्रिका प्राणायाम करतो, त्यावेळी सुरुवातीस मनामध्ये विचित्र कल्पना,चमत्कारिक विचार व स्वप्न दिसू लागतात.साधक कदाचित भयभीत ही होतो.अशा वेळी मनाचे शंखप्रक्षालन म्हणजेच चित्त शुद्धी होते आहे असे समजावे.
     प्राणशक्ती उत्तेजित होण्यासाठी फक्त खोल श्वास (Deep breathing) घेणेच महत्वाचे नाही. खोलवर श्वासाने श्वसन यंत्रणा व रक्ताभिसरण यावर चांगला परिणाम होतो,परंतु मेंदूवर परिणाम होत नाही.वैज्ञानिक प्रयोगातून सिद्ध झाले आहे की,एकाग्रतेने व सजगतेने प्राणायाम केल्यास मेंदूवर चांगला परिणाम होतो,व मेंदू लहरी (Brain waves) मध्ये सकारात्मक बदल दिसून येतात.
      मेंदूमधील विद्युतलहरी जसे बीटा,अल्फा,थिटा व डेल्टा ह्या लहरी मनाच्या वेगवेगळ्या स्थितीशी जसे जागृत, स्वप्न, सुषुप्ती(निद्रा) व तुरीया अवस्थांशी कर्मश: सम्बधित असतात.
      श्वासोच्छवास हा थेट मेंदूशी जोडलेला असतो.तसेच भावनिक मेंदू (Hypothalamus) शी जोडलेला असतो,  म्हणून जेंव्हा जेंव्हा भावना बदलतात तेंव्हा श्वासही बदलतो. जेंव्हा श्वास तालबद्ध किंवा मंद, संयमित असतो, त्यावेळी भावना नियंत्रित असतात.
      प्राणायामाने हळू हळू कुंभकाचा अवधी वाढवला जातो.सरावाने जेंव्हा कुंभकाचा अवधी वाढतो, त्यावेळी मेंदूकडे जाणाऱ्या संवेदनांची संख्या कमी होते, त्यामुळे मेंदूला प्रतिसाद कमी द्यावा लागतो. आणि मेंदूस आराम मिळतो,त्यास शांत वाटते,तो सक्षम बनतो.
    स्वायत्त मज्जासंस्थेवर प्राणायामाच्या होणाऱ्या परिणामावरून त्याचे तीन प्रकार पडतात.
   १. जे प्राणायाम उष्णता निर्माण करतात जसे चैतन्यपूर्ण प्राणायाम (Vitalizing) जसे  भस्त्रिका व कपालभाती यांचा परिणाम अनुकंपा मज्जासंस्थेवर पडून ती सक्रिय बनते.
  २. ज्या प्राणायामापासून उष्णता कमी होते,शांत वाटते,व तणावरहित वाटते जसे शांतीपूर्ण प्राणायाम (Tranquillizing) जसे भ्रामरी, उज्जयी, शितली, शित्कारी प्राणायाम याच्यामुळे परानुकम्पा मज्जासंस्था सक्रिय होते.
  ३.संतुलनात्मक प्राणायाम (Balancing) जसे नाडीशोधन याचा प्रभाव अनुकंपा व परानुकम्पा मज्जासंस्थेवर सारख्याच प्रमाणात पडतो.
       संशोधनाने सिद्ध झाले आहे की,नाकामधील त्वचे मध्ये (Mucous membrain) केंद्रीय मज्जासंस्थेपेक्षा वीस पटीने स्वायत्तमज्जा तंतु जास्त प्रमाणात असतात. श्वास घेतल्यानंतर आत जाणाऱ्या हवेच्या प्रवाहाबरोबर दोन्ही नाकपुडयामधील त्वचेच्याखाली असलेल्या विशिष्ट स्वायत्त मज्जातंतुमुळे श्वसनसंस्था,रक्ताभिसरण व पचनसंस्था प्रभावित होतात.
       प्राणायाम शक्यतो पहाटे ब्रह्ममुहूर्तावर सकाळी ४ ते ६ मध्ये करावा कारण त्यावेळी कमी ध्वनी प्रदूषण व स्वच्छ हवा असते. यावेळी हवेत जास्तीतजास्त ऋण विद्युत भारित आयन (Negative ions) असतात त्यामुळे प्राणायामानंतर जास्त ऊर्जा प्राप्त होते व प्रसन्न वाटते.
    प्राणायाम व योग करताना सूती कपड्याचा वापर करावा.सिंथेटिक कपडे धन भारित आयन (Positive ions) आकर्षित करतात व ऋण भारित आयन
(Negative ions) विकर्षित करतात.त्यामुळे प्राणायामात निर्माण होणारी ऊर्जा कमी होते.
     महर्षि पतंजलि यांनी कुम्भक म्हणजेच प्राणायाम असे म्हणले आहे.कुम्भकामध्ये श्वास रोकुन धरल्यामुळे मेंदुमधील कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण वाढते,त्यामुळे मज्जापेशी मज्जाकेन्द्रकांना श्वास घेण्यासाठी उत्तेजित करतात. एका न्यूरॉन मधून दुसऱ्या न्यूरॉन मध्ये प्रेरणा (Nerve impulse) जाण्यासाठी त्याच्या सिनॅप्स (Synapse) मधून जावे लागते त्यासाठी न्यूरोट्रान्समीटर ची गरज असते.जितक्या जास्तवेळ श्वास रोकून धरला जाईल तितक्या जास्त प्रमाणात  न्यूरॉट्रान्समीटर तयार होऊन प्रेरणा वाहून नेली जाते.त्यामुळे मेंदूमध्ये नवीन न्यूरॉनल मार्ग तयार होतात .तसेच मेंदू केंद्र उत्तेजीत होतात.याचाच भाग म्हणून प्राणायामामध्ये किंवा कुंभकाच्या अभ्यासात चिदाकाशात (डोळे बंद केल्यानंतर दिसणारा पडदा) प्रकाश व वेगवेगळे रंग दिसू लागतात.

sharadyogvigyan.blogspot.com


योग विज्ञान प्राणायाम भाग १०

 Monday 18th May 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
प्राणायाम भाग १०
      सध्याच्या काळात प्राणायामाचे त्याच्या परिणामावरून मुख्य तीन प्रकारामध्ये वर्गीकरण केले आहे.
१. संतुलनात्मक (Balancing practices)
२. चैतन्यपूर्ण  ( Vitalizing practices)
३.शांतीपूर्ण   (Tranquillizing practices)
नवीन साधकांनी नाडीशोधन प्राणयामापासून सुरुवात करावी.ज्यामुळे इडा आणि पिंगळा यांच्या श्वास प्रवाहाचे संतुलन होईल.चैतन्य निर्माण करणारे भस्त्रिका आणि कपालभाती प्राणायामाने उष्णता निर्माण होते,असे प्राणायाम मध्यम आणि प्रगतिशील साधकांनी करावेत.शांती प्रस्थापित करणारे प्राणायाम शरीर आणि मन शांत करते.तसेच प्राणिक प्रवाह वाढतो, आणि सूक्ष्म स्पंदन व नाद याबद्धलची जागरूकता वाढवितो. भ्रामरी ,उज्जायी, शीतली, शित्कारी प्राणायाम हे शांती प्रस्थापित करणारे प्राणायाम असून यांचा प्रभाव परानुकंपा (Parasympathetic ) मज्जासंस्था व केंद्रीय मज्जासंस्था यावर पडतो.अश्या प्राणायामाचा सराव संतुलनात्मक ( नाडीशोधन) प्राणायानानंतर करावा.
     ज्यांना उच्चरक्तचाप आहे अशानी जलद श्वसन करू नये.परंतु ज्यांना उदासीनता, सुस्ती,आळस आणि ज्यांचा रक्तदाब कमी आहे अशानी जलद श्वसन (चैतन्यपूर्ण) करावे.ज्यांना स्वायत्त मज्जासंस्थेवर नियंत्रण प्राप्त करावयाचे आहे त्यांनी जास्तीतजास्त कुंभकाचा (Retention of breath) सराव करावा.
    प्राणायामापासून जी ऊर्जा आपल्या शरीरास मिळते ती आपण अश्या प्रकारे समजू शकतो.प्राणायामामुळे शरीरात स्थिर विद्युत शक्ती (Static electrisity) तयार होते. ज्यामुळे श्वासावाटे हवेतून शरीरात गेलेले धनभारीत आयन ( Positive ions) रिचार्ज होऊन त्यांचे रूपांतर ऋण आयन (Negative ions) मध्ये होते.ज्याप्रमाणे पाऊस पडून गेल्यानंतर आपणास उत्साही आणि चैतन्यपूर्ण वाटते कारण पावसामुळे वातावरणातील पॉझिटिव्ह आयन्स रिचार्ज होऊन निगेटिव्ह आयन्स मध्ये बदलतात. शुद्ध हवेच्या ठिकाणी निगेटिव्ह आयन चे प्रमाण जास्त असते.त्यामुळे आपणास प्रसन्न वाटते.अस्वच्छ कोंदट किंवा दमट हवेमध्ये पोझीटीव्ह आयनचे प्रमाण जास्त असते.त्यामुळे आपणास सुस्त,आळस व थकल्यासारखे वाटते. प्राणायामामुळे शरीरात स्थिर विद्युत तयार होऊन कांही प्रमाणात पॉझिटिव्ह आयनचे रूपांतर निगेटिव्ह आयनमध्ये झाल्यामुळे आपणास उत्साही व उर्जावान वाटते.
      योगामध्ये शितलीकरण किंवा तणावरहित (Relaxation) होणे म्हणजे फक्त शरीर तणावरहित नसून चेतन ( जागृत ) मन व अवचेतन (अर्धजागृत) मन ही शांत, शिथिल व तणावरहित होणे आवश्यक असते.बऱ्याच वेळा शरीर शांत असते परंतु मन अशांत असते. तसेच मन शांत असले तरी अवचेतन मन शांत असेलच असे नाही.जसे झोपेची गोळी घेतली तर शरीर आणि जागृत मन शांत होईल परंतु खोलवर अवचेतंन मनातील काळजी तशीच राहते. प्राणायामामुळे प्रभावीपणे सर्वच स्तरावर शांतता व शिथिलता प्राप्त होऊ शकते.
     प्राणायामामध्ये दिर्घश्वसनाचा अभ्यास केला जातो. ज्यामध्ये पूरक (श्वास घेणे) आणि रेचकाचे (श्वास सोडणे) प्रमाण हे १:२ असणे अपेक्षित असते, जे हृदयासाठी फारच उपयुक्त आहे.श्वास घेताना हृदयाची गती वाढते तर श्वास सोडताना हृदयाची गती कमी होते.दीर्घ श्वसनामध्ये रेचक जास्तीतजास्त लांबविला जातो.त्यामुळे हृदयाची गती जास्त काळ कमी रहाते.त्यामुळे हृदयातील स्नायूंना  विश्रांती मिळते.तसेच मेंदू व शरीरातील इतर अवयवांना रक्त पुरवठा योग्य प्रमाणात होतो.
        पूरक आणि रेचकाचे हेच प्रमाण १:४ केले तर हृदयास विश्रांती मिळण्याऐवजी जास्त काम करावे लागते.कारण मेंदूला मिळणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे मेंदू हृदयाला जास्त काम करण्यास भाग पाडते.

sharadyogvigyan.blogspot.com
 
   




Sunday, 17 May 2020

योग विज्ञान प्राणायाम भाग ९

Sunday 17th May 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)

प्राणायाम भाग ९
      प्राणायामातील बंधामुळे शरीरातील काही ठराविक भागावर दाब निर्माण होतो, विशेषकरुन अन्तःस्त्रावी ग्रन्थि (Endocrine glands) त्यामुळे त्या सक्रीय होवून आधिक
चांगले कार्य करतात. बंधामुळे परिणाम होणाऱ्या भागाचा मज्जातंतुच्या जोड़णी मध्ये वाढ होते व तो भाग किंवा अवयव अधिकच क्षमतेने काम करू लागतो.
       कांही प्राणायामांचा स्वायत्त मज्जासंस्था (Autonomic nervous system) जसे अनुकंपा मज्जासंस्था (Sympathetic nervous system) व परानुकम्पा मज्जासंस्था(Parasympathetic nervous system) यावर उत्तेजनात्मक व कांहींचा प्रतिबंधात्मक परिणाम दिसून येतात.
      आपल्या मेंदूमध्ये कोट्यवधी मज्जापेशी अनियमितपणे कार्यान्वित असतात.अश्या मेंदूचा आलेख (E. E. G) घेतल्यास मेंदू लहरी मध्ये अनियमित पैटर्न दिसून येतो.गोंधळलेल्या मनाची स्थिति म्हणजेच मज्जापेशींचा अनियमित पैटर्न म्हणावयास हरकत नाही.जेंव्हा मज्जापेशी तालबद्धतेने काम करीत असतात, त्यावेळी मनही नियंत्रित असते,ज्यामुळे विचार,कृती, निर्णय क्षमता,भावनावरिल नियंत्रण, जागरूकता यावर चांगला प्रभाव पडतो.
      सन १९६८ मध्ये भारतीय स्वास्थ मंत्रालयाच्या सांगण्यावरुन बिहार स्कूल ऑफ योगा मध्ये हॄदयांच्या रोग्याच्या हजारो पेशंटवर एक संशोधन अभ्यास झाला.त्यामधे विशेषतः अंनजायना ,मायोकार्डियल इन्फारक्शन ,कोरोनरी हार्ट डसीज,इस्कीमिया (ischemia) वग़ैरेचे हॄदयाशी सम्बंधित रोगी होते.सर्वांकडून योग आणि प्राणायामाचा अभ्यास करून घेतल्यानंतर सर्वांनाच त्याचा फायदा झाला. प्राणायामामुळे कमी झालेला मानसिक तणाव आणि खोल, हळूवार व दीर्घ श्वसनांमुळे हृदयास मिळालेल्या विश्रांतीचा हा परिणाम असावा असे सिद्ध झाले.
     योगा रिसर्च फाउंडेशन मुंगेर येथे २००७ मध्ये ३० रक्तचाप असणाऱ्या युवकावर संशोधन झाले.त्यामध्ये सर्व युवकांकडून नाडीशोधन प्राणायाम (१:१) या प्रमाणात एक महिना नियमित अभ्यास करून घेतला. अभ्यासाअंती सर्वांचे सिस्टोलीक व डायास्टोलिक ब्लडप्रेशर सामान्य झाल्याचे निदर्शनास आले .
      सन २००६ मध्ये योगा रिसर्च फाउंडेशन भोपाळ येथे २२ अस्थमा पेशंट ,११ उच्चरक्तचाप व ७ निरोगी युवकावर उज्जयी प्राणायामामुळे होणाऱ्या परिणामाचा अभ्यास झाला.त्यामध्ये सर्वाकडून दररोज ५ मिनिटे असे एक महिना उज्जयी प्राणायामाचा अभ्यास केल्यानंतर असे निदर्शनास आले की, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण ०.७५ % वरून      ५ % जे की सर्वाधिक होते. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण सरासरी २ % पर्यंत पोहोंचले होते जी एक लक्षणीय वाढ आहे.
       भस्त्रिका आणि कपालभाती प्राणायाम हे चैतन्य (Vitalizing) निर्माण करणारे प्राणायाम असून यामुळे श्वसनासाठी कामी येणाऱ्या स्नायूंचा चांगला व्यायाम होतो.तसेच स्वायत्त मज्जासंस्थेस (Central Autonomic Nervous System) जास्त प्रेरणा मिळते.त्यामुळे मेंदू सक्रिय बनतो.यास यौगिक परिभाषेत सुषुम्ना जागृत होणे असे म्हणतात.वर्ष २००४ मध्ये योग रिसर्च फाउंडेशन ने हे प्रयोगाअंती सिद्ध ही केले आहे.
     भस्त्रिका प्राणायाम हा जलद केला जातो आणि जी माणसे अति सक्रिय आहेत आणि मनाने चंचल आहेत अशा लोकांनी भस्त्रिका प्राणायाम करणे जास्त महत्वाचे व फायदेशीर ठरू शकते.

sharadyogvigyan.blogspot.com
 

Saturday, 16 May 2020

योगविज्ञान प्राणायाम भाग ८

Saturday 16th May 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
प्राणायाम भाग ८
     मनाचा आणि श्वसनाचा इतका निकटचा सम्बन्ध आहे की,एकाची स्थिती बदलली की,दुसऱ्याचे स्वरूप अपरिहार्यपणे बदलते.मनात येणारे विचार,भावना,वासना याने श्वसनाची संख्या ,गती व स्वरूप बदलते.
      भयाचा विचार आला की,श्वासोच्छस्वास बंद होण्याची वेळ येते किंवा तो कांही काळ थांबतो. राग आल्यास श्वास जोरात चालतो.निराश झाल्यास मंद, लांब श्वास टाकतो.भांडण किंवा दोन हात करण्याची वेळ आल्यास श्वास कोंडला जातो.चमत्कार किंवा नवलपूर्ण घटना अनुभवली की, श्वासोच्छवास कांही क्षण बंद होतो.डोक्यात विचारचक्र किंवा टेंशन आल्यास श्वास जोरात चालतो.त्याची गती वाढते.पूर्ण समाधानाच्या अवस्थेत श्वास मंद व लयबद्ध चालतो.
      मनाला नियंत्रणात आणण्यासाठी श्वासावर नियंत्रण आणणे महत्त्वाचे आहे,म्हणजेच प्राणायाम करणे आवश्यक आहे. प्राणायामाने श्वासावर प्रभुत्व मिळविले की, त्याचा परिणाम म्हणून मनावर स्वामित्व मिळते. मनावर ताबा मिळविला की, भावना,वासना,इच्छा,विचार , कल्पना यावर नियंत्रण येते व योगी चा स्वभाव बदलतो.तो सात्विक होतो.
     मेंदूमध्ये मुख्यत्वे दोन भाग आहेत.एक मागील मागील भाग(posterior brain) जो एक स्वाभाविक भाग असून जेंव्हा जेंव्हा आपण स्वाभाविक श्वसन (अनैच्छिक किंवा जाणिवेशिवाय केलेले श्वसन, Involuntory breathing) करतो त्यावेळी मेंदूचा मागील भाग उत्तेजित होतो किंवा त्याभागात नोंद होते.जेंव्हा आपण ऐसच्छिक श्वसन किंवा जाणीवपूर्वक (Voluntary breathing) करतो. त्यावेळी मेंदूचा पुढील भाग (Frontal cortex) उत्तेजित होतो.किंवा त्या मेंदूच्या भागात त्याची नोंद होते. जाणीवपूर्वक केलेल्या श्वसनाचा परिणाम मेंदूवर फार वेगळ्या प्रकारे होतो. स्वाभाविक श्वसनामध्ये प्राणशक्ती संपूर्ण शरीरात
पसरते परंतु ती विकास,वाढ किंवा उत्क्रांती होण्यासाठी पुरेशी नसते.म्हणून प्राणायामाद्वारे प्राणशक्तीमध्ये वाढ होऊन ती विकास व उत्क्रांती होण्यासाठी पुरेशी असते.
     ऐच्छिक श्वसनाचा परिणाम फ्रँटल कॉर्टेक्स वर होतो, तो नेहमी सक्रिय राहतो.फ्रँटल कॉर्टेक्स मधून निघालेल्या आज्ञा संवेदना (motor impulses) लम्बमज्जा (Medulla Oblongata) मधील श्वसन केंद्रा कडे न जाता दुसऱ्या मार्गाने जातात.त्यामुळे फ्रँटल कॉर्टेक्स ची वाढ होते.भावनिक मेंदूचेही नियंत्रण होते.
     नाडीशोधन प्राणायमामध्ये आपण ऐच्छिक श्वसन करतो, त्यावेळी डाव्या नाकपुडीने (इडा नाडी) श्वास घेतल्यास मेंदूचा उजवा  गोलार्ध उत्तेजित होतो.तर उजव्या नाकपुडीने (पिंगळा नाडी) श्वास घेतल्यास मेंदूचा डावा गोलार्ध उत्तेजित होऊन त्याची क्रियाशीलता वाढते.जेंव्हा दोन्ही नाकपुड्या समसमान चालतात त्यावेळी दोन्ही गोलार्ध तालबद्ध व सारखेच सक्रीय होतात.
     तणावामध्ये मेंदूचा आलेख (E.E.G.) केल्यानंतर त्यामध्ये बीटा तरंग दिसून येतात.प्राणायामामुळे त्या अल्फा,डेल्टा व थिटा तरंग यामध्ये रूपांतरित होतात ज्यामध्ये माणूस तणावमुक्त व शांत होतो तसेच तणावामुळे हृदयावर निर्माण झालेला दाबही कमी होतो.
     विज्ञानाने सिद्ध झाले आहे की,तणावामध्ये निर्माण होणारे स्ट्रेस हार्मोन्स (Adrenocortical harmones) प्राणायामामुळे कमी होतात.आणि तणावमध्ये प्रतिकार करण्याची शक्ती वाढते. मेंदूमध्ये अल्फा तरंगाचे प्रमाण वाढते त्यामुळे शांतता व स्थिरता वाढते. कमी ऑक्सिजन मध्ये फुफ्फुसाच्या पूर्ण क्षमतेने काम करण्याचे कौशल्य प्राप्त होते,मानसिक शक्ती वाढते.दैनंदिन जीवनात जाणिवेने काम करण्याची क्षमता वाढते. हृदय व श्वसनसंस्था यांची कार्यक्षमता सुधारते.रोगप्रतिकार शक्ती वाढते.तसेच ऐच्छिक श्वसनामुळे (conscious breathing) मनावर शांत परिणाम होतो.

Sharadyogvigyan.blogspot.com
   
       


Thursday, 14 May 2020

योग विज्ञान प्राणायाम भाग ७

 Wednesday 13th May 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
  प्राणायाम भाग ७ 
      कुंडलीनी शक्तीचे निवासस्थान मूलाधार चक्रात आहे सामान्यतः कुंडलिनी ही मूलाधार चक्रामध्ये सुप्तावस्थेत असते. प्राणायमातील कुंभकाच्यावेळी मूलाधार चक्रातील तापमान वाढते आणि ऑक्सीजनचेही प्रमाण कमी होवून नगण्य होते.त्यामुळे कुण्डलिनीचे घुटन होते.मस्तिष्क मधील मेंदू तरंग न्यूनतम होतात. त्यावेळी मूलाधारमधे तरंगे उत्पन्न होतात.यासच कुण्डलिनी जागरण म्हणतात.
      श्वासोच्छवासाचा वेग,हृदय स्पंदनाची गति आणि स्वायत्तमज्जासंस्था यांचा परस्पराशी संबंध आहे.जेंव्हा श्वासोच्छवासाचा दर कमी होतो,५ ते ६ श्वासोच्छवास / मिनिट त्यावेळी सर्वांचिच तालबध्दता (Rhythm) कमी होते.त्यावेळी निश्चलता ,शांतता व हॄदयाचे स्पंदन मंद होते. (Bradicardia) ,ब्लडप्रेसर कमी होते (Hypotention),रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.(Hypoglycemia) हे परिणाम दिसून येतात.प्राणायमच्या अभ्यासाने श्वसनाचा दर कमी करता येतो याचाच अर्थ वरील सर्व परिणाम प्राणायामाने दिसून येतात.
     बहुतांशी लोक चुकीच्या पद्धतीने श्वासोच्छवास करतात. ते त्यांच्या फुफ्फुसाच्या क्षमतेच्या कांही भागाचाच वापर करतात.अशा माणसांचा श्वास खूप उथळ असतो. अशा श्वासातून मिळणारा ऑक्सिजन हा अपुरा असतो.त्यामुळे कार्य करण्यास प्राणशक्ती कमी पडते.त्यामुळे योग्य पद्धतीने श्वास घेण्याची आणि सोडण्याचे तंत्र शिकून घेणे आवश्यक आहे .जे प्राणायामाच्या माध्यमातून शिकवले जाते.जेंव्हा योग्य पद्धतीने श्वास चालू रहातो त्यावेळी त्यास चांगले वाटावयास लागते.जेंव्हा श्वास अयोग्य पद्धतीने व बिना जाणिवेणे घेण्याची सवय लागते त्यावेळी रोग निर्माण होतात.
      प्राचीन काळी योगी आणि ऋषी यांच्या निदर्शनास आले की, अजगर,हत्ती,कासव या सारख्या प्राण्यांचा श्वास अगदी मंद गतीने चालतो.त्यामुळे हे प्राणी जास्त दिवस जगतात.या उलट पक्षी,कुत्रा,ससा यांचा श्वास जलद गतीने चालतो.त्यामुळे त्यांचे आयुष्यमान कमी असते.यापासून योगीच्या लक्षात आले की मंद श्वासामुळे दीर्घायुष्य लाभते.
    भौतिक दृष्ट्या श्वासाचा थेट संबंध हृदयाशी येतो.मंद श्वास गतीमुळे हृदयास विश्रांती मिळते.त्यामुळे त्याचे चांगले पोषण होते.व ते मजबूत बनते,त्यामुळे दीर्घायुषी बनण्यास त्याचे योगदान मिळते.
        प्राणायामाच्या अभ्यासामध्ये बऱ्याच वेळेस यौगिक श्वसन (yogic breathing) करावयास सांगितले जाते.ज्यामध्ये जास्तीतजास्त हवा फुफ्फुसात घेतली जाते.त्यामुळे वायूकोष (Alveoli) जास्तीतजास्त फुगतात.त्यामुळे जास्तीतजास्त हवेची देवाणघेवाण होते.सामान्य श्वसनामध्ये ५०० ml हवा घेतली जाते.तर यौगिक श्वसनामध्ये ५००० ml हवा घेतली जाते.त्यामुळे शरीरास जास्तीतजास्त ऑक्सिजनचा पुरवठा होतो.सामान्य श्वसनामध्ये ज्या वायू कोषापर्यंत पर्यंत हवा जात नाही त्या वायूकोषापर्यंत यौगिक श्वसनामध्ये हवा पोहोंचते. व त्या सक्रिय बनतात.वायूकोष बरेच दिवस बंद स्थितीत राहिल्यास तेथे स्त्राव जमा होतो व त्याचा संसर्ग होऊन रोग निर्माण होऊ शकतो.
      प्राणायामाच्या अभ्यासाने शाररिक व भौतिक लाभ होतात हे विज्ञानाने सिद्ध झालेच असून शिवाय त्याचा शरीरातील आंतरिक अवयव तसेच शाररिक क्रिया प्रणाली वर सकारात्मक परिणाम होतो.तसेच प्राणिक आणि मानसिक संतुलन साधुन जानिवेचि उच्च पातळी आणि मेंदुतील केंद्र जागृत करणे हाच प्राणायामाचा मुख्य उद्देश्य आहे. शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत प्राणशक्ति(जीवनी शक्ति) पोहोंचवणे हा प्राणायमाचा हेतु आहे.

Sharadyogvigyan.blogspot.com


Tuesday, 12 May 2020

योग विज्ञान प्राणायाम भाग ६

Tuesday 12th May 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
प्राणायाम भाग ६
     नाकाने श्वास घेतल्यामुळे १० ते १५ % प्राणवायू रक्तामध्ये जास्त प्रमाणात मिसळतो.हे नाकातील सायनसेस मध्ये तयार होणाऱ्या नायट्रिक ऑक्साईडमूळे (Nitric Oxide) शक्य होते.हा शोध १९९५ मध्ये नोबेल पारितोषिक मिळविणाऱ्या तीन शास्त्रज्ञानी लावला.हा शोध लागण्यापूर्वी नायट्रिक ऑक्साईड म्हणजे वातावरणातील दूषित वायू समजला जात असे.परंतु या शोधामुळे हा नायट्रिक ऑक्साईड वायू महत्वाचा असून तो नैसर्गिकरित्या आपल्या शरीरातच तयार होतो. ह्या वायूमुळे शरीरातील रक्तवाहिन्या प्रसरण पावतात व रक्त प्रवाह वाढतो.जेव्हा नायट्रिक ऑक्साईड नाकामधून हवेबरोबर फुफ्फुसात जातो त्यावेळी वायुकोषातील (Alveoli) रक्तवाहिन्या प्रसरण पावतात.त्यामुळे रक्तप्रवाह वाढतो व ऑक्सिजन व कर्बाम्लवायूची देवाणघेवाण वाढते.तोंडाने श्वास घेतल्यावर हे शक्य होत नाही.हे फक्त नाकाने श्वास घेतल्यावरच शक्य होते.कारण नायट्रिक ऑक्साईड नाकातच तयार होते.जेंव्हा एखादा व्हेंटिलेटरवर (Respirator) असेल तरी हा परिणाम दिसत नाही.कारण श्वासोच्छवास हा तोंडाने चालू असतो.अशावेळी बाहेरून नायट्रिक ऑक्साईड दिले तरी हा परिणाम दिसत नाही.कारण हा नायट्रिक ऑक्साईड नैसर्गिक नसतो.नायट्रिक ऑक्साईडमुळे रक्ताभिसरण वाढते,वेदना कमी होतात,वजन कमी होते,ऊर्जा शक्ती वाढते,रोग प्रतिकारक शक्ती वाढते,पचनक्रिया सुधारते,आळस कमी होतो,मेंदूचे कार्य सुधारते याचाच अर्थ हे सर्व फायदे नाकाने श्वास घेतल्याने होतात.
     उज्जयी प्राणयामामुळे १७ % ने हृदयाचे उत्पादन (cardiac output) वाढते व हृदयाची गती कमी होते.जेंव्हा कुंभकाशिवाय उज्जयी प्राणायाम केला जातो.
       प्राणायमच्या अभ्यासाने प्राण आणि अपान एकत्र येवून वरच्या दिशेने प्रवाहित होतात.त्यावेळी इडा आणि पिंगळा स्वर सम स्थितीत येतात.अशावेळी प्राण हा सुषुम्नेतून वाहू लागतो. त्यावेळी ज्ञानप्रकाश प्रदीप्त होतो.कुंडलिनी जागृत होते.मन विचारशून्य अवस्थेत येते.कर्म बीज जळून भस्म होतात आणि मस्तिष्कामधील सुप्त केंद्र जागृत होतात. ज्ञानाचा प्रकाश प्रदीप्त होतो.साधारणपणे आपणास ज्ञान है सर्व इन्द्रीयपासुन प्राप्त होते.परंतु योगामधे मस्तिष्क,मन आणि चेतना यांना इन्द्रीयपासुन परावृत्त करून ज्ञान प्राप्ति होते.यालाच कुंडलिनी शक्ति जागृति म्हणतात.
      विज्ञानानुसार मानवाचा जेंव्हा विकास सामान्यतः होत असतो त्यावेळी त्याच्या मेंदुमधील ग्रेमॅटर (Grey matter) मध्ये परिवर्तन होत असते. प्राणायमच्या ह्या अभ्यासाने हा विकास स्वाभाविक पेक्षा जलद गतीने होतो.
      सामान्य श्वसन ही एक अनैच्छिक क्रिया असून अचेतन मनाने ती चालू असते. त्यावेळी मोठा मेंदू (cerebral cortex) ऐवजी लहान मेंदू द्वारे (Medulla Oblongata) कार्य चालू असते.प्रणायामामधे सजगता ही कायम श्वासावर असते.त्यामुळे चेतन श्वसन (ऐच्छिक श्वसन )हे मोठा मेंदुच्या नियंत्रणाखाली कार्य करते.नियमित प्राणायमाच्या अभ्यासाने मोठ्या मेंदुचे नियंत्रण कार्य जास्त प्रभावशाली बनते व जास्त विकसित होतो.या प्रक्रियेस टेलीन्सफलायझेशन (telencephalization) असे म्हणतात.चेतन श्वसन है मनावर शांतिदायक परिणाम करतो.त्यामुळे मनावरील ताण कमी होतो.म्हणूनच क्रोधामधे ,भीतिमधे,वेदनेमधे लांब लांब - दीर्घ श्वास घ्यावयास सांगीतले जाते.त्यामुळे मन शांत होते.

Sharad yog vigyan.blogspot.com

Monday, 11 May 2020

योग विज्ञान प्राणायाम भाग ५


Sunday, 10th May 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
प्राणायाम भाग ५
      समुद्रसपाटीवर हवेचा दाब ७६० mm Hg आणि ऑक्सिजनचा दाब१५० mm Hg असतो. समुद्रसपाटीपासून जितके उंच जावे तितका हवेचा दाब कमी होत जातो.हवेतील प्राणवायूचे प्रमाण ही कमी होत जाते.हिमालयसारख्या उंच पर्वतीय भागात माउंट एव्हरेस्टवर हवेचा दाब २२५ mmHg    तर ऑक्सिजनचा ४२ mm Hg एव्हढा असतो.समुद्राखाली १६५ फूट खोलवर हवेचा दाब ४५०० mm Hg, तर ऑक्सिजनचा ९००mm Hg एवढाअसतो.हिमालायसारख्या उंच पर्वतीय भागावर कुठलेही काम करतांना जास्त थकवा जाणवतो.श्वसनाच्या आणि रक्ताभिसरणाच्या क्रियेवर, प्राणवायूच्या कमतरतेमुळे जास्त ताण जाणवतो. प्राणायामाचा समुद्रसपाटीवर असताना चांगला अभ्यास केलेला असल्यास उंच पर्वतीय प्रदेशात गेल्यावर येणारा हा ताण कमी जाणवतो.व बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेऊन शरीरास समस्थिती राखण्याचे काम जास्त लवकर व जास्त चांगल्या प्रकारे हाऊ शकते.
       सर्वसाधारणपणे हृदयाचे कार्य, रक्ताभिसरण,चयापचय क्रियेचा वेग आणि नियमनहे स्वायत्त (अनैच्छिक) मज्जासंस्थेद्वारे होत असते. परंतु प्राणायामाच्या। विशेषकरून कुंभकस्थितीचा दीर्घकाळ अभ्यास केल्याने एरवी या अनैच्छिक नियंत्रणाबाहेर असणाऱ्या क्रियांवर हवा तसा प्रभाव पाडण्याचे कौशल्य प्राप्त करता येते. त्याद्वारे हृदयगतीचा वेग कमी करता येणे,श्वासोच्छश्वासाची गती कमी होणे,शरीरातील वेगवेगळ्या भागात रक्ताचे अभिसरंण कमी जास्त करता येणे,चयापचय क्रियेचा वेग कमी करून शाररिक उर्जेचा कमीत कमी वापर होईल असे करता येणे या गोष्टी साध्य होऊ शकतात.
        उज्जयी, भ्रामरी, भस्त्रिका , कपालभाती अनुलोम- विलोम यांचा मज्जासंस्थेवर होणारा परिणाम जवळजवळ सारखाच असतो.सर्व परीक्षणात मेंदूच्या विद्युत आलेखात (E.E.G) अल्फा तरंगाची प्रकर्षाने वाढ झाल्याचे दिसते.ज्यावेळी मन हे अतिशय सजग परंतु शांत अश्या ध्यानाच्या अवस्थेत जाते त्यावेळी हे अल्फा तरंग अधिक प्रमाणात असतात.
     मेंदूवर होणाऱ्या परिणामांची जाणीव करून घेण्यासाठी एक प्रयोग केला गेला.ज्यामध्ये आठ योग साधकांच्या समूहाने रोज दोन वेळेस ५ ते १० मिनिटे भ्रामरी प्राणायाम चार महिने केला.मेंदूतील थिटा आणि अल्फा तरंग वाढले होते जे साधारण खोल ध्यानाच्या अवस्थेत दिसून येतात.त्यामुळे परमानंदाची भावना येते.सजग असूनही विचारशून्य अवस्था निर्माण होते.ताणतणाव नष्ट होतो.म्हणून भ्रामरी प्राणायामाचा तणाव घालविण्यासाठी प्रभावी उपचार म्हणून केला जातो.
     आपल्या शरीरात लागणारी ऊर्जा फक्त आपल्या आहारातूनच मिळते असे नाही तर श्वासावाटे घेतलेल्या हवेतूनही मिळते.शास्त्रज्ञांच्या शोधातून असे निष्पन्न झाले आहे की, आपल्या शरीरात असणारे Adenosine Tri Phosphate (A T P) ह्या रसायनापासून ऊर्जा मिळते आणि हे A T P कमी किंवा हे रसायन तयार होण्यास कांही समस्या निर्माण झाल्यास जीवनशक्ती, उत्साह कमी होतो व रोग होऊ शकतो. हे A T P रसायन तयार होण्यासाठी प्राणवायूची (Oxigen) ची नितांत गरज असते. प्राणायमामध्ये ह्या महत्वाच्या A T P मध्ये वाढ होते.

Sharad yogvigyan.blogspot.com

Friday, 8 May 2020

योग विज्ञान प्राणायाम भाग ४

7th May 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
प्राणायाम भाग  ४
      रेचक करताना हवेला बाहेर जाण्यास अवरोध केल्याने हवा सावकाश बाहेर सोडता येते. रेचकाचे प्रमाण पुरकापेक्षा दुप्पट असणे योगशास्त्राच्या दृष्टीने महत्वाचे असते.त्यामुळे फुफ्फुसातील हवा जास्तीत जास्त बाहेर सोडता येते.नंतरच्या पुरकात येणारी शुद्ध हवा जास्तीतजास्त घेता येते. कर्बाम्लवायूचे प्रमाण सहन करण्याची क्षमता  वाढल्यामुळे कर्बाम्लवायू काही प्रमाणात वाढला तरी अपाय न होता मज्जासंस्था शांत होते. असे आधुनिक विज्ञानही सांगते.रेचक जास्तीत जास्त वेळ केल्याने चिकाटी,धैर्य व संयम वाढण्यास मदत होते.मनाची अधीरता ,अस्थिरता कमी कमी होत जाते.निश्चय वाढतो,स्थिरता वाढते, मनोकायिक ताण, चिंता दूर होतात व मन शांत होत गेल्याने भावनांचा उद्रेक होत नाही.त्यामुळे हृदयगती व रक्तदाबही वाढत नाही व तो नियंत्रित राहतो.
     सामान्य श्वसनात छाती व उदर पोकळीत जे दाब उत्पन्न होतात त्यापेक्षा अधिक तीव्रतेचे दाब प्राणायामाच्या श्वसन पद्धतीत उत्पन्न होतात.त्यामुळे छाती व उदर पोकळीत वेगवेगळ्या अवयवाचे मर्दन होऊन त्यातील रक्त संचार बदलतो.तेथील स्नायूंचे कार्य प्रभावित होते.व त्या क्षेत्रातील मज्जातंतू उत्तेजित होऊन प्रतिक्षिप्त क्रियेद्वारा अनेक स्थानिक व सार्वदेहीक बदल घडून येतात.
      प्राणायाम करीत असताना मूलबंध, उद्दीयांनबंध व जालंधरबंधाचा वापर केला जातो.या बंधाच्या वापरामुळे कुंभकाची अवस्था जास्त काळ टिकवून धरता येते आणि कुंभकाच्या अवस्थेत छाती व पोटात तीव्र दाब उत्पन्न होतो.त्यामुळे शरीरातील फुफ्फुसे,हृदय,यकृत आदी नाजूक अवयवावर विपरीत परिणाम न होता ते कार्यान्वित होतात.
     प्राणायमामध्ये कमी प्राणवायूचा वापर करून जास्तीत जास्त प्राणवायू शरीराच्या इतर कार्यासाठी उपलब्ध करून दिला जातो.प्राणायामाच्या दीर्घकाळ अभ्यासाने व त्याच्या श्वसन पद्धतीमुळे साधकास कमी श्रमात जास्त प्राण वायू उपलब्ध होतो.
      श्वसनाद्वारे आपल्या फुफ्फुसातून हवा सतत आत- बाहेर होत असते. याला वायुवीजन म्हणतात.एका मिनिटात जेव्हढी हवा आत-बाहेर होते त्याला "मिनिट वायुवीजन" असे म्हणतात.प्राणायामात जेव्हा श्वास दीर्घ परंतु अतिमंद होतो व एका मिनिटातील श्वासोच्श्वासाची गती खूप कमी होते अशा वेळी हे मिनिट वायुवीजनही खूप कमी होते.परंतु हवा बराच काळ फुफ्फुसात रहात असल्यामुळे फुफ्फुसातील प्राणवायू व कर्बाम्लवायू यांच्या आपापसातील देवांणघेवांणीच्या कार्यात फारसा फरक पडत नाही.आणि त्यामुळे श्वसन गति खूप मंद होऊनही व मिनिट वायुवीजन कमी होऊनही रक्तातील प्राणवायू व कर्बाम्लवायू यांच्या प्रमाणात कुठलेही बदल होत नाहीत.या उलट कपालभाती क्रिया व भ्रस्तिका प्राणायाम या सारख्या प्रक्रिये मधे श्वसन गती वाढून एका मिनिटातील श्वसनाची संख्या खूप वाढलेली असते.मिनिट वायूवीजन नेहमीपेक्षा खूपच पटीने वाढलेले असते.त्यामुळे काही प्रमाणात रक्तामधील कर्बाम्लवायूचे प्रमाण थोडे कमी होते .परंतु हा बदल इतक्या अल्पांशाने होतो की , त्यामुळे रक्तातील कुठल्याच इतर घटकात लक्षणीय असा बदल होत नाही.याचा अर्थ प्राणायामाच्या मंद अथवा जलद गतीच्या कोणत्याच प्रकाराचा परिणाम रक्तातील प्राणवायू,कर्बाम्लवायू अथवा आम्ल व अल्कली यांच्या संतुलनावर कसलाच परिणाम होत नाही व साम्यावस्था कायम राहते.

Sharadyogvigyan.blogspot.com
     

Wednesday, 6 May 2020

योग विज्ञान प्राणायाम भाग ३

6th May 2020

🧘🏻‍♂योग विज्ञान शृंखला🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
प्राणायाम  भाग ३
     नेहमीच्या स्वाभाविक श्वसनात आपण ५०० मि.ली. हवा घेतो तर पूरक मध्ये १ ते १.५ लिटर हवा आपण घेतो. फक्त एका पूरक चा विचार केल्यास फुफ्फुसांमध्ये  एका सामान्य श्वासाच्या मानाने निश्चीतच जास्त प्राणवायू उपलब्ध आहे. वेळही जास्त लागल्याने फुफ्फुसाचे वायूकोष व रक्तवाहिन्या यामधील प्राणवायू व कर्बाम्लवायू  यांची अदलाबदल जास्त परिणामकारक रीतीने होते. पण प्राणायामात एका मिनिटात असे पूरक २ किंवा ३ च होतात. त्यामुळे ५ ते १० मिनिटात होणाऱ्या प्राणायामाच्या अभ्यासात मिळणारे प्राणवायूचे प्रमाण ५ ते १० मिनिटात होणाऱ्या सामान्य श्वासनातील प्राणवायूच्या प्रमाणापेक्षा कमीच असते. परंतु प्राणायामात जास्तीत जास्त वायूकोषाचा उपयोग व त्याचे जास्तीत जास्त ताणले जाणे यामुळे दिवसभर आपली फुफ्फुसांची कार्य क्षमता चांगली राहते.
     कुंभकात आपण जवळ जवळ  १० ते २० सेकंद श्वास रोखुन ठेवतो तोपर्यंत हृदयातून रक्त येणे व जाणे  १५ ते २५ वेळा होते. वेळही भरपूर व रक्ताचे प्रमाण हवे त्यापेक्षा जास्त झाल्याने प्राणवायू रक्तात येणे व कर्बाम्लवायू रक्तातून वायूकोषात येणे हे वाढीव क्षमतेने होते. काही क्षणातच एका मर्यादेनंतर म्हणजे जेंव्हा वायूकोष व रक्तवाहिन्यातील वायूचे प्रमाण ,दाब समान होतात व वायूची अदलाबदल होऊ शकत नाही. अशावेळी रक्तातील कर्बाम्लवायूमुळे लंबमज्जा           ( Medula Oblongata) मधील रसायन ग्राहक  (Chemo receptors) अधिकाधिक उत्तेजित होतात व प्रतिक्षिप्त क्रियेने केंद्रामार्फत प्रश्वास घडवून आणू पाहतात. परंतु आपल्या जोरदार इच्छेपुढे त्याचे कांही चालत नाही. अर्थात रसायन ग्राहकांना जास्तीत जास्त कर्बाम्लवायुचे प्रमाण सहन करण्याची सवय हळू हळू लावावी लागते. म्हणूनच कुंभकाचा वेळ सरावाने हळू हळू वाढवायचा असतो.
       प्राणायाम करण्यासाठी शांत चित्ताने, शरीर व मन शिथिल ठेवून रिकामे पोटी बसावे. अशावेळी एकूणच प्राणवायूची गरज कमी असते आणि जास्तीत जास्त प्राणवायू घेणे- मिळविणे हे उद्दीष्ट नाही. ध्यान व पुढील उच्च साधनेसाठीमज्जासंस्थेस तयार करणे हे आहे.प्राणायामाचा सराव लक्षपूर्वक जाणीवपूर्वक व्हावा म्हणून पूरक,कुंभक,बंध, विशिष्ठ स्वरचे (उदा.भ्रामरी, उज्जायी इ.) प्रयोजन आहे.ह्या सर्व क्रिये मूळे एकाग्रता वाढते.यांत्रिकतेने प्राणायाम कधीही करू नये.त्यामुळे म्हणावा तसा परिणाम दिसून येत नाही.

sharadyogvigyan.blogspot.com

Tuesday, 5 May 2020

योग विज्ञान प्राणायाम भाग २

योग विज्ञान शृंखला* 🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
प्राणायाम भाग २
        श्वास घेते वेळी म्हणजेच पुरकाच्या वेळी श्वास हवा फुफ्फुसात जाण्यासाठी श्वास पेशींना प्रयास करावा लागतो. म्हणून ही सक्रिय ( Active) क्रिया आहे,तर रेचक ही क्रिया निष्क्रिय (passive) आहे , कारण हवा बाहेर येण्यासाठी श्वासपेशींना प्रयास करावा लागत नाही. प्राणायामात रेचकाची क्रिया ही पुरकपेक्षा जास्त हळुवार आणि दीर्घकाळ चालते. ही हळुवार चालणारी रेचकाची क्रिया मोठा मेंदू (cerebral cortex) याच्या नियंत्रणाखाली चालते. मोठा मेंदू हा लहान मेंदूमधील श्वसन केंद्रावर अवरोध निर्माण करतो. त्यामुळे ती रेचक क्रिया हळुवार होते. हा अवरोध भावनांशी संबधित असलेल्या हैपोथॅलॅमस वरही पडतो. त्यामुळे रेचकाच्या वेळी शिथिलता आणि शांती भाव प्रदान होतो. म्हणून प्राणायामात पूरक आणि रेचकाचे प्रमाण १:२ असे ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.
       कुंभकात ऑक्सिजनचे जास्तीत जास्त शोषण होते. तसेच स्नायूतंत्रास शरीरात वाढलेल्या कार्बनडाय ऑक्साईडच्या वाढलेल्या स्तराशी सहनशील होण्याचे प्रशिक्षण मिळते. जेंव्हा मेंदूतील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण कमी होते त्यावेळी दीर्घ श्वास चालू असतो.
       कुंभकाचा परिणाम मेंदूवर होतो. त्यामुळे शरीरातील अनैच्छिक क्रियांवर नियंत्रण प्राप्त होते. ज्याप्रमाणे कांही योगी हृदयाच्या गतीवर नियंत्रण आणू शकतात. त्याची गती कमी करण्यास व वाढवीण्यास सक्षम असतात. हृदय हे एक असे अवयव आहे त्यावर मेंदूमधील हैपोथॅलॅमस चे नियंत्रण असते. याचाच अर्थ एक निष्णात हैपोथॅलॅमसवर नियंत्रण आणू शकतो.त्यामुळे हृदयक्रिया,शरीर तापमान तसेच पचनसंस्था यावर नियंत्रण प्राप्त होते,ज्या अनैच्छिक क्रिया आहेत.
       जेंव्हा केवल कुंभक लागतो त्यावेळी भूमध्यामध्ये प्रकाश बिंदू तयार होऊन तो चिदाकाशामध्ये पसरतो. मेंदूचा अग्रभाग ज्योतिर्मय वाटतो. ज्याप्रमाणे सकाळच्या वेळी उजाडते. आपल्या मेंदूतील एकावेळी एकच गोलार्ध काम करीत असतो.परंतु केवल कुंभकात दोन्ही गोलार्धामधील पातळ पडदा कॉर्पस कैलॉसम मधून संवेदना दोन्हीकडे जातात.त्यामुळे दोन्ही गोलार्ध काम करू लागतात.सर्वच केंद्र उत्तेजित होतात.
       पूरक,कुंभक व रेचकाचे प्रमाण १:२:२ किंवा १:४:२ असे ठेवून प्राणायाम केल्यास एक मिनिट प्राणायामाच्या वेळी घेतली गेलेली एकूण हवा ही एक मिनिटांचे सामान्य श्वासनात घेतल्या जाणाऱ्या एकून हवेपेक्षा कमी असते. त्यामुळे प्राणायामात आपण जास्त प्राणवायू घेतो किंवा मिळतो हे खरे नाही.मात्र प्राणायामात दीर्घ श्वास घेतला गेल्याने व नंतर कुंभक केल्याने फुफ्फुसामधील जास्तीत जास्त वायूकोष नेहमीपेक्षा ताणले जातात आणि रक्तातील कर्बामलवायू व वायुकोषातील प्राणवायू यांची अदलाबदल होण्यास भरपूर वेळ मिळतो
प्राणायामात पूरक रेचक करताना शांतपणे,हळुवार,सहजतेने व कोठल्याही प्रकारची घाई न करता करावे. श्वसनाचा जोर (force) सर्व अवस्थांमध्ये एकसारखा असावा व त्यावर नियंत्रण असावे. पूरक रेचक शांतपणे संपले पाहिजे. काहींना पुरकाचे शेवटी जोराने श्वास घेऊन छाती फुगविण्याची व रेचकाच्या शेवटी पोटाने स्नायू जोराने आकुंचन करण्याची सवय असते. असे करणे कटाक्षाने टाळले पाहिजे. त्यामुळे कुंभकाचे प्रमाण आणि पुढील आवर्तन बिघडण्याचा संभव असतो. प्राणायमच्या हॄदयक्रियेवरिल परिणामांचे परीक्षण केले असता असे दिसून येते की,कपालभाति व भ्रस्तिका प्राणायाम करताना रक्तदाब वाढतो. तर भ्रामरी,उज्जायी यामधे तो कमी होतो.त्रिबन्धात्मक कुम्भकाचा वापर केल्यास रक्तदाबातील बदल अधिक तिव्रतेने होतात.

sharadyogvigyan.blogspot.com

Monday, 4 May 2020

योग विज्ञान प्राणायाम भाग 1

योग विज्ञान शृंखला* 🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
प्राणायाम भाग १
      सामान्य माणसामध्ये प्राणायाम म्हणजे सर्वसाधारणपणे स्वासोच्छवास नियंत्रण हेच त्यांचे स्थूल रूप लोकांच्या डोळ्यापुढे येते. परंतु प्राणायामाची संकल्पना सूक्ष्मदृष्टया आणि खूप खोलात जाऊन पाहिल्यास त्यापेक्षा खूपच व्यापक आणि विस्तारित आहे.
   प्राणायाम म्हणजे प्राणाचा आयाम . यातील प्राण आणि  आयाम या दोन्ही शब्दाचे अनेक अर्थ संभवतात. प्राणायामाचे व्यवहारातले प्रयोगात्मक स्वरूप डोळ्यापुढे आणल्यास प्राण म्हणजे स्वसोच्छवासाची क्रिया व आयाम म्हणजे या क्रियेचे एका विशिष्ठ पद्धतीने व जाणीवपूर्वक केलेले नियंत्रण असाच अर्थ होतो.
      प्राण म्हणजे शरीरांतर्गत सर्व जैविक क्रियांचे अधिष्ठान असणारी शक्ती,जी उत्तरोत्तर सूक्ष्म व तरल होत जाणाऱ्या प्राण शक्तीचा सर्व कार्य विस्तार जाणिवेच्या कक्षात आणणे असाही होतो.
    प्राणायामाचा अभ्यास हा अध्यात्मिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त व आवश्यक आहे  शरीराच्या आतमध्ये ज्याला देहकाश किंवा घटाकांश असेही म्हंटले जाते. त्यात नेहमी काहीं ना काही जैविक क्रिया चालू असतात. त्यातील सूक्ष्म रूपातील क्रिया बरेचदा आपल्या जाणिवेच्या कक्षेत येत असतात. परंतु बहुतांशी इतर बऱ्याच क्रिया या सूक्ष्म स्तरावर घडत असून क्वचितच आपल्याला त्याची जाणीव होते. त्यांना जाणिवेच्या कक्षेत आणून त्याचे नियमन करावयाचे असल्यास आपली अंतर्गत संवेदनशीलता ही अतिशय सूक्ष्म व सर्वग्राही होणे आवश्यक आहे. त्याद्वारेच आपल्या जाणिवेचे क्षेत्र व स्वरूप समृद्ध होऊ शकते. त्यासाठी ज्या अनेक पद्धती प्रचलनात आल्या त्यात प्राणायामाला अग्रस्थान आहे.
     प्राणायामाच्या स्थूल अंगाचा जस-जसा अभ्यास वाढून त्यात अधिकाधिक कौशल्य प्राप्त होत जाईल तस-तसे साधकाने आपले लक्ष प्राणायामाच्या स्थूल अंगाकडून सूक्ष्म अंगाकडे वळवावे अशी अपेक्षा असते. त्यातूनच या प्राणशक्तीचे सूक्ष्म स्तरावर कसे नियंत्रण करावे याचा अभ्यास
तो करू लागतो.
     सुईमधून दोरा ओवतांना आपला श्वास किंचित काळ थांबतो कारण त्यामुळे मनाची एकाग्रता होऊन ते कार्य साधते. तसेच जेंव्हा लक्षपूर्वक किंवा एकाग्रतेने काम करीत असतो त्यावेळी इतर विचारही थांबलेले असतात.
     मनाचा आणि श्वसनाचा इतका निकटचा सबंध आहे की, एकाची स्थिती बदलली की, दुसऱ्याचे स्वरूप अपरिहार्य पणे बदलते. मनात येणारे विचार ,भावना,वासना याने श्वसनाची संख्या, गती व स्वरूप बदलते.
      ज्यावेळी राग,द्वेषादी भावनांचा अतिरेक होतो त्यावेळीही आपल्या श्वसनाची गती,खोली, व श्वास घेणे आणि सोडण्याचा प्रकार यात फरक झालेला असतो. कारण भावनांचा आणि इतर मानसिक अवस्थांचा परिणाम मज्जासंस्थेवर होतो व त्याद्वारे आपल्या श्वासनात बदल होतात. म्हणजेच जर मुद्दाम स्वेच्छेने आपल्या श्वसनात योग्य तो बदल केला व त्याचा रोज सराव केला तर आपल्या भावनावर, मनावर नियंत्रण आणू शकतो. प्राणायामाने मनावर ताबा मिळविणे, मानसिक स्थिरता, शांतता मिळविणे हाच मुख्य उद्देश आहे. त्यामुळे ध्यान करणेही सोपे जाते.

sharadyogvigyan.blogspot.com