Wednesday, 22 April 2020

योग विज्ञान योगासन भाग ५

*योग विज्ञान शृंखला* 🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
योगासन भाग ५
         ध्यानाच्या आसनामधे बैठक स्थितीमध्ये नेहमी मान, पाठ,कंबर (मेरुदंड) सरळ ठेवण्यास सांगतात. कारण त्या स्थितीमध्ये मज्जातंतू मधून जाणाऱ्या सर्व संवेदना मेरुदंडातील मज्जारज्जूद्वारे मेंदूकडे जातात. मेरुदंड सरळ राहिल्यास त्या संवेदना सहजपणे मेंदूपर्यंत पोहोचू शकतात. तसेच सुषुम्ना ही मुख्य नाडी मेरुदंडातील मज्जारज्जूच्या      ( spinal cord) मध्यातून जाते. ऊर्जा प्रवाहास सुषुम्नेच्या मधून वरच्या दिशेस जाण्यासाठी ती सरळ असल्यास सोपे जाते. ही सुषुम्ना जर एका बाजूस (इडा किंवा पिंगळाकडे) झुकलेली असल्यास प्राण प्रवाहास प्रतिबंध होतो.
         बिहार स्कूल ऑफ योगा आणि पोलंड येथील शास्त्रज्ञ डॉ अलेकसंद्रोविक पॅसेक आणि डब्लू रोमाँनोवस्की तसेच भारतातील शास्त्रज्ञ एम. ए . वेंगर आणि बी. के. बागची यांनी सिद्ध केले की, नियमित आसनाच्या सरावाने अनुकंपा स्वायत्त मज्जासंस्थेचा (Sympathetic N. System) परिणांम कमी होतो व परानुकंम्पा स्वायत्त मज्जासंस्थेचा परिणाम वाढतो. त्यामुळे हृदयाचे स्पंदन कमी होणे,ब्लडप्रेशर कमी        होणे,स्नायूंमध्ये शिथिलता येणे हे परिणाम दिसून येतात. अंत: स्त्रावी ग्रंथीमध्ये समतोलपणा येतो.
        शवासनामध्ये किंवा कोणत्याही विश्रांतीकारक आसनामध्ये संपूर्ण शरीर स्थिर आणि शिथिल झालेले असते सर्व स्नायूही शिथिल व तणावरहित झालेले असतात. अशावेळी स्नायूकडून मेंदूकडे जाणारे संवेदनात्मक संदेश      ( Sensory impulse) शरीराकडे किंवा स्नायूकडे येणारे आज्ञात्मक संदेश (Motor Impulses) हे थांबलेले असतात किंवा खूप कमी झालेले असतात. त्यामुळे कांही काळ शरीराची जाणीव कमी झालेली असते म्हणजेच शरीर आणि मनाचा संबंध तुटलेले असतो.जेंव्हा शरीर पूर्णपणे शांत,स्थिर,शिथील आणि तणावरहित होते,त्यावेळी मन हे शरीरापासून विलग झालेले असते. त्याचा परिणाम म्हणून शरीरातील स्नायूपेशी,मज्जापेशी,रक्तवाहिन्या,सर्व अवयवपेशी ह्या तणावरहित होतात. त्याचा परिणाम म्हणून मेंदूकडून येणारे आज्ञात्मक संदेश हे कमी झाल्यामुळे मेंदूस आराम मिळतो. त्यामुळे शाररिक हलकेपणाचा व मानसिक शांततेचा,प्रसन्नतेचा आणि आनंदाचा प्रत्यय येतो.

sharadyogvigyan.blogspot..com

No comments:

Post a Comment