Thursday, 16 April 2020

योग विज्ञान योगासन भाग 1

योग विज्ञान शृंखला* 🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
योगासन भाग १
आसन म्हणजे सुखपूर्वक बसण्याची स्थिती असून योगासन   हा योगाभ्यासातील प्राथमिक भाग असून त्यामुळे प्राणिक आणि मानसिक शक्तीचा विकास होतो.व्यायाम केल्यानंतर येणारा थकवा,दम,घाम हे आसने केल्यावर अपेक्षित नाही. उलट आसनाने मनाला स्थिरता, शांती,विश्रांती मिळावी हा प्राथमिक उद्देश आहे.
   आसनाचे मुख्य दोन अंग आहेत. पहिला हालचालींचा गतिशील भाग   (dynamic aspect) तर दुसरा स्थिरतेचा भाग (static aspect) . हालचाल ही सावकाश,सहजतेने ,जोर न लावता करावी जेणे करून थकवा येणार नाही. ध्यानात्मक आसनामध्ये स्थिरतेला जास्त महत्व आहे. 
चलीत आसनामध्ये शक्तीशाली हालचाल असून शरिराची लवचिकता वाढते. तसेच रक्ताभिसरण व स्नायूंचा सांध्यावरील ताण वाढतो. शरीरातील प्राणिक अडथळे (energy blocks) निघून जातात. तसेच फुफ्फुसे, पचनसंस्था,उत्सर्जन संस्था समर्थवान व कुशल बनते. नवीन साधकांनी चलीत आसने केल्यास उपयोग होतो. उदा, सूर्यनमस्कार,चलीत पश्चिमोतासन,चलीत ताडासन,व चलीत हालासन.
     स्थिर आसने अनुभवी योगसाधकांनी करावीत. स्थिर आसनाचे आदर्श स्थितीमध्ये काही काळ स्थिर राहणे महत्वाचे आहे.स्थिर आसनांचा परिणाम प्राणिक व मानसिक शरीरावर दिसून येतो.याचा परिणाम शरीरांतर्गत अवयवावर जसे मेंदू,हृदय,फुफ्फुस,स्वादुपिंड यावर तर होतोच शिवाय मनावर परिणाम होत. मन शांत होते. मन आणि शरीर एकमेकास पूरक आहेत. ज्यावेळी शरीर स्थिर असेल त्यावेळी मन शांत असते. मन स्थिर नसेल किंवा चंचल असेल त्यावेळी शरीर स्थिर राहू शकत नाही. म्हणून शरीरास स्थिर करून मनाला शांत करता येते. त्याबरोबर भावनाही स्थिर होतात. 
शरीर हे द्वंदाचे परिणाम भोगत असते. मन व बुद्धीचा शरीराशी सतत सबंध असल्यामुळे ते द्वंदाचा विचार करतात.जेंव्हा मन आणि बुद्धी रममाण (attentive) असते त्यावेळी शरीरावर द्वंदाचा परिणाम होत नाही. म्हणून योगामध्ये स्थिरता,एकाग्रता व सजगता यास अनन्य साधारण महत्व आहे.
    हाडांच्या भोवती असणारे असंख्य स्नायू व लिगमेंट्स त्या दोन हाडामधील अंतर ठेवण्याचे काम करतात. त्यामुळे हालचालीच्या वेळी वेदना होत नाहीत. ह्या स्नायूंना कार्यक्षम राहण्यासाठी आसनांचा अभ्यास दिला आहे.आसनामध्ये स्नायूंचा तणाव , खिचाव व दबाव यांचा वापर होतो.त्यामुळे स्नायूंची कार्यक्षमता वाढते व शरीर सुस्थितीत ठेवण्यास मदत होते. 
योगासनामध्ये स्नायू स्थिर स्थितीत ताणले जातात व त्याची समलांबी ( isometric) हालचाल होते. ज्यामध्ये स्नायूंची लांबी कायम राहते, पण ताण ( Tone) बदलतो. या हालचालीत प्राणवायू कमी लागतो. 

sharadyogvigyan.blogspot.com







x

No comments:

Post a Comment