Thursday, 23 April 2020

योग विज्ञान योगासन भाग ६


*योग विज्ञान शृंखला* 🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
  योगासन भाग ६     शवासनामध्ये GABA (Gamma amino butiric acid) हे रसायन मेंदूमध्ये तयार होते जे रसायन एका मज्जापेशीतून दुसऱ्या मज्जापेशीत संदेश पाठविण्यास अटकाव करते. त्यांना inhibitory Neurotransmitter म्हणतात. या रसायनामुळे मेंदूकडे जास्तीचे संदेश व संवेदना कमी होतात. त्यामुळे संदेशाची गर्दी कमी होते व मेंदूस शांत आणि तणावरहित वाटते.
      बैठक स्थितीत शरीरातील 4 कॅलरी/ मिनिट खर्च होतात. शवासनात 2 कॅल/ मिनिट खर्च होतात.  बी. एम. आर (Basic Metabolism Rate) ही कमी होतो. त्यामुळे ऊर्जा कमी खर्च होते व शांत वाटते. थकवा कमी होतो.
     आपल्या शरीरात रोगप्रतिकार शक्ती (Immune System) कार्यरत असते. त्यामध्ये शरीरातील प्रत्येक पेशी हा बाहेरील विषाणूशी लढत असतो. या क्रियेमध्ये शरीरातील अनेक घटक सहभाग घेत असतात. आपल्या शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी लसीका ग्रंथी ( Lymph nodes) असतात. जेथे आपल्या संरक्षक पेशी (White blood cells) व विषाणू यांच्यामध्ये लढाई होते. सम्पूर्ण शरीरभर लसीका रस (Lymphtic Fluid) आपल्या शरीरामधून वहात असतो. जो विषाणूंचे अनावश्यक मृतपेशी वाहून नेण्याचे काम करीत असतो.
      रक्ताभिसरणासाठी शरीरात ह्रदयाद्वारे रक्त पूर्ण शरीरात पंप केले जाते. परंतु लसीका रस वाहून नेण्यासाठी अशी कोणतीही योजना किंवा पंप शरीरात नसतो. त्यामुळे लसिकाचे पूर्ण शरीरभर रसाभिसरण होण्यासाठी स्नायूंच्या आकुंचनाच्या आणि प्रसरणाची आवश्यकता असते. याचाच अर्थ शरीरातील वेगवेगळ्या भागाची हालचाल होणे आवश्यक असते. म्हणून स्नायूंची हालचालच लसीकभिसरणासाठी पंप आहे. म्हणून शरीरातील वेगवेगळ्या भागांचा व्यायाम किंवा हालचाल जी आपण योगासनामध्ये करतो ती लसीका रसाच्या अभिसरणासाठी आवश्यक आहे. स्वासपटलाची हालचाल जी आपण कपालभाती , अग्निसारमध्ये करतो त्यामुळे लसाभिसरण जलद होते. ज्यामुळे पोटातील लसीकाग्रंथीवर प्रभाव पडतो. तितली आसनामुळे जांघेतील लसीकाग्रंथीवर प्रभाव पडतो. पोटरीच्या स्नायूंच्या (Calf muscles) हालचालीमुळे पायाकडील लसीका रस वरच्या दिशेने जातो. पोटरीच्या स्नायूंना दुसरे हृदय अशीही उपमा दिली जाते. कारण त्याच्या आकुंचनाने पायाकडील लसीका रस गुरुत्वाकर्षणानाच्या विरुद्ध वरच्या दिशेने जातो. म्हणून योगासनातील चलीत आसनामुळे व वेगवेगळ्या हालचालीमुळे हा लसीका रस चलनात रहातो. हा लसीका रस अभिसरणात राहिल्यामुळे विषाणूशी रक्तातील संरक्षक पेशी (WBC )चा सामना होतो. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते.

sharadyogvigyan.blogspot.com

Wednesday, 22 April 2020

योग विज्ञान योगासन भाग ५

*योग विज्ञान शृंखला* 🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
योगासन भाग ५
         ध्यानाच्या आसनामधे बैठक स्थितीमध्ये नेहमी मान, पाठ,कंबर (मेरुदंड) सरळ ठेवण्यास सांगतात. कारण त्या स्थितीमध्ये मज्जातंतू मधून जाणाऱ्या सर्व संवेदना मेरुदंडातील मज्जारज्जूद्वारे मेंदूकडे जातात. मेरुदंड सरळ राहिल्यास त्या संवेदना सहजपणे मेंदूपर्यंत पोहोचू शकतात. तसेच सुषुम्ना ही मुख्य नाडी मेरुदंडातील मज्जारज्जूच्या      ( spinal cord) मध्यातून जाते. ऊर्जा प्रवाहास सुषुम्नेच्या मधून वरच्या दिशेस जाण्यासाठी ती सरळ असल्यास सोपे जाते. ही सुषुम्ना जर एका बाजूस (इडा किंवा पिंगळाकडे) झुकलेली असल्यास प्राण प्रवाहास प्रतिबंध होतो.
         बिहार स्कूल ऑफ योगा आणि पोलंड येथील शास्त्रज्ञ डॉ अलेकसंद्रोविक पॅसेक आणि डब्लू रोमाँनोवस्की तसेच भारतातील शास्त्रज्ञ एम. ए . वेंगर आणि बी. के. बागची यांनी सिद्ध केले की, नियमित आसनाच्या सरावाने अनुकंपा स्वायत्त मज्जासंस्थेचा (Sympathetic N. System) परिणांम कमी होतो व परानुकंम्पा स्वायत्त मज्जासंस्थेचा परिणाम वाढतो. त्यामुळे हृदयाचे स्पंदन कमी होणे,ब्लडप्रेशर कमी        होणे,स्नायूंमध्ये शिथिलता येणे हे परिणाम दिसून येतात. अंत: स्त्रावी ग्रंथीमध्ये समतोलपणा येतो.
        शवासनामध्ये किंवा कोणत्याही विश्रांतीकारक आसनामध्ये संपूर्ण शरीर स्थिर आणि शिथिल झालेले असते सर्व स्नायूही शिथिल व तणावरहित झालेले असतात. अशावेळी स्नायूकडून मेंदूकडे जाणारे संवेदनात्मक संदेश      ( Sensory impulse) शरीराकडे किंवा स्नायूकडे येणारे आज्ञात्मक संदेश (Motor Impulses) हे थांबलेले असतात किंवा खूप कमी झालेले असतात. त्यामुळे कांही काळ शरीराची जाणीव कमी झालेली असते म्हणजेच शरीर आणि मनाचा संबंध तुटलेले असतो.जेंव्हा शरीर पूर्णपणे शांत,स्थिर,शिथील आणि तणावरहित होते,त्यावेळी मन हे शरीरापासून विलग झालेले असते. त्याचा परिणाम म्हणून शरीरातील स्नायूपेशी,मज्जापेशी,रक्तवाहिन्या,सर्व अवयवपेशी ह्या तणावरहित होतात. त्याचा परिणाम म्हणून मेंदूकडून येणारे आज्ञात्मक संदेश हे कमी झाल्यामुळे मेंदूस आराम मिळतो. त्यामुळे शाररिक हलकेपणाचा व मानसिक शांततेचा,प्रसन्नतेचा आणि आनंदाचा प्रत्यय येतो.

sharadyogvigyan.blogspot..com

Tuesday, 21 April 2020

योग विज्ञान योगासन भाग ४

*योग विज्ञान शृंखला* 🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
योगासन भाग ४
   स्नायूंचे शिथलिकारण ही एक सक्रिय क्रिया आहे. तरुणांमध्ये कांही स्नायू कायम आकुंचनाच्या स्थितीत असतात. जसे पाठीचे स्नायू(Erector spinae) जे बसण्याच्या आणि उभे राहण्याच्या स्थितीत राहण्यासाठी मदत करतात.त्यांच्यावर स्वेच्छेने नियंत्रण प्राप्त करता येते. शिथलिकरणासाठी लागणारी ऊर्जा कॅल्शियमचे आयन (ca++) पासून मिळते. जे स्नायूमधील सारकोप्लाजमिक रेटिकुलम (sarcoplasmic Reticulum) मधील ऍक्टिनॉमिओसीन (Actinomyocin) पासून कॅल्शिअम आयन मिळतात. रक्तातील कॅल्शिअम कमी झाल्यास स्नायूमधील ताण वाढतो.
 शवासनामध्ये आपण मुद्दाम एका नंतर एक स्नायूंचे शितलीकरण करीत जातो. शितलीकरणाची क्रिया हळूहळू रक्तवाहिन्यातील स्नायू (Smooth muscles) पर्यंत जाते. त्यामुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि त्यामुळे रक्तदाब कमी होतो.
     आसनामध्ये स्नायू जास्त वेळ आकुंचन स्थितीमध्ये राहिल्यामुळे तेथे हैपोक्सिया (Hypoxia कमी ऑक्सिजन असण्याची स्थिती) होतो. असे निदर्शनास आले आहे की, स्नायूपासून मिळालेला स्टेम सेल्स( stem cells) जर हैपोक्सिक वातावरणात ( ६% ऑक्सिजन) राहिला तर ते माँयोसाईट्स मध्ये (Myocytes) रूपांतरित होतात आणि त्यापासून स्नायू बनतो. परंतु तोच स्टेम सेल २०% ऑक्सिजनच्या वातावरणात वाढला तर त्याचा ऍडीपोसाईट्स (Adipocytes) म्हणजेच मेद ( Fat) वृद्धिमध्ये रुपांतरित होते. म्हणून नेहमी आसन कारणाऱ्यात लठ्ठपणा दिसून येत नाही.कारण आसनामुळे स्नायू हायपोक्सिया स्थितीत जातात.
     आसन ही शरीराची विशिष्ट स्थिती असून त्याचा प्राण प्रवाह मेंदूच्या ठराविक केंद्रापर्यंत जातो. हाटयोगामध्ये आसनात प्राण प्रवाहाचे शुद्धीकरण करून पुन:रचनेद्वारा शरीरावर नियंत्रण आणले जाते.
     आसनाच्या सततच्या सरावाने आसनामध्ये स्थिरता येते. कारण प्राण प्रवाह हा मुक्तपणे होतो. त्यामुळे कुठलीही व्याधी होत नाही. ज्याप्रमाणे साचलेल्या पाण्यात अप्रवाहित किंवा साठून राहिलेल्या पाण्यामुळे व्याधी किंवा विकार निर्माण होतो. म्हणून प्राण हा नेहमी पाण्याप्रमाणे प्रवाहित असावा.
     जेंव्हा प्राण प्रवाह हा मुक्त किंवा प्रवाहित असतो त्यावेळी शरीर लवचिक असते. जेंव्हा शरीर ताठ किंवा कडक असते त्यावेळी प्राण प्रवाहामध्ये अडथळा असतो व विषद्रव्ये साठलेली असतात. जेंव्हा प्राण प्रवाह सुरळीत होतो (आसनाच्या सरावाने) त्यावेळी ही विषद्रव्ये निघून जातात व शरीर वाकू शकते, ताणू शकते व हालचाल तणावरहित होते व शरीर लवचिक बनते.
   
sharadyogvigyan.blogspot.com

Monday, 20 April 2020

योगविज्ञान योगासन भाग 3

*योग विज्ञान शृंखला* 🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
योगासन भाग 3
       व्यायाम करणाऱ्याचे किंवा एरोबिक चा अभ्यास करणाऱ्याचे स्नायू पिळदार आणि मोठ्या आकाराची असतात, कारण स्नायू मध्ये समताण (isotonic) हालचाल होते. हे स्नायू फुगीर दिसतात,हालचालीत प्राणवायू जास्त प्रमाणात लागतो. त्यांना पूर्वस्थितीत येण्यास वेळ लागतो. कारण त्यांच्यामध्ये ऑक्सिडेंटिव्ह चयापचय ( oxidative metabolism) वाढते. तसेच स्नायुतील मायटोकॉनड्रिंयाचे
( mytochondria) प्रमाण वाढते.
      योगासनामध्ये स्नायूंची स्थिर स्थिती असते आणि त्यांच्यामधील हालचाल ही समलांबी ( isometric) असून स्नायूंचा आकार बदलत नाही.प्राणवायू कमी लागतो. आणि स्नायू कमी वेळात पूर्वस्थितीत येतात.
         योगासनामध्ये स्नायू जास्त वेळ आकुंचनाच्या स्थितीमध्ये असतात . त्यामुळे स्नायुवरील रक्तवाहिन्यावर सतत दाब राहिल्याने रक्तवाहिन्या रिकाम्या होतात. स्नायू प्रसरण पावल्यानंतर दाब कमी होतो व रक्तवाहिन्यांमधील रक्त प्रवाह वाढतो. आसनामध्ये स्नायू सतत आकुंचन स्थितीत ठेवण्यासाठी जी ऊर्जा लागते ती स्नायूमधील ए. टी. पी. ( Adenosine Triphosphate) आणि क्रियाटिन फ़ॉस्फेट (Creatine Posphate) यामधून घेतली जाते. त्याचप्रमाणे स्नायूंमध्ये मायोग्लोबिन(Myoglobin)असते. ज्यामध्ये ऑक्सिजन साठवून ठेवलेले असते.त्यामधून ही ऊर्जा घेतली जाते. ज्याप्रमाणे रक्तामध्ये हिमोग्लोबिन ऑक्सिजनचा पुरवठा करते त्याचप्रमाणे मायोग्लोबिन स्नायूंमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करते.
     नियमित आणि सततच्या योगासनाच्या अभ्यासाने साधक एखाद्या आसनाच्या आदर्श स्थितीमध्ये जास्त वेळ स्थिर राहू शकतो कारण त्याच्या स्नायूंमध्ये क्रियाटिन आणि मायोग्लोबिनचे प्रमाण वाढलेले असते.
आसनामध्ये साधक जेंव्हा पूर्णस्थितीमध्ये स्थिर होतो त्यावेळी त्याचा श्वास खोल व लांब होतो. ही क्रिया साधारणपणे जेंव्हा मोठे स्नायू उदा.:पाठीच्याकण्याच्या बाजूच्या स्नायूंमध्ये (paraspinal muscles) आढळते. उदा: भुजंगासन,सलभासन, त्रिकोणासन,मत्स्यासन इत्यादी.आसन सोडल्यानंतर त्यास ३ ते ४ दीर्घ श्वास घ्यावे लागतात.
   
sharadyogvigyan.blogspot.com

Friday, 17 April 2020

योग विज्ञान योगासन भाग 2

*योग विज्ञान शृंखला* 🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
योगासन भाग 2
स्नायुचे कार्य करीत असताना त्यामधे लैक्टिक अँसिड ( Lactic acid) हे विजातीय द्रव्य तयार होत असते. जास्त श्रम झाल्यानंतर हे लॅक्टिक अँसिड जास्त प्रमाणात स्नायूंमध्ये जमा होते व त्याचा निचरा होत नाही.त्यामुळे लॅक्टिक ऍसिड तेथेच जमा होऊन पोटरीत गोळा (cramps) येतो. थोडे थांबल्यानंतर अशुद्ध रक्तवाहिनी द्वारे लॅक्टिक ऍसिडचा निचरा होतो व त्याची पातळी कमी होते. नियमित आसने केल्याने स्नायूंमध्ये नीला आणि रोहिणीचे जाळे भरपूर प्रमाणात वाढते व लॅक्टिक ऍसिड वाढले तरी त्याचा निचरा लवकर होतो व थकवा येत नाही. तसेच हाडाच्या वाढीसाठी लागणारी खनिजे योग्य प्रमाणात पुरविली जातात.
पाठदुखीमध्ये दोन मणक्यामधील अंतर कमी होऊन यातील कुर्चा बाहेर ढकलला जातो त्यामुळे दोन माणक्यामधून बाहेर पडणाऱ्या नसावर दाब पडतो व सायटिका सारखे रोग उद्भवतात. पाठीची निरनिराळी आसने केल्यामुळे दोन मणक्यातील अंतर व्यवस्थित राहून बाहेर पडणाऱ्या नसावर दाब पडणार नाही व पाठदुखीचा त्रास होणार नाही.
      ध्यान करताना पद्मासन,स्वस्तिकसन किंवा सिद्धासनात करतात. कारण मंडी घातल्यामुळे खालील भाग रुंद होतो. त्यामुळे आसनात स्थिरता येते व ध्यान करणे सोपे होते. तसेच पद्मासनामध्ये पायातील रक्ताभिसरण कमी होते. त्यामुळेडोके आणि मेंदूकडे रक्तपुरवठा वाढतो.प्राणायाम व ध्यानामध्ये त्याचा फायदा होतो. ध्यान मुद्रेमुळे हातामध्ये ऊर्जा साठवून ठेवली जाते.
आसनामध्ये मुख्यता पाठीचा कणा, छाती व पोटातील अवयवावर परिणाम होतो . त्यामुळे अनैश्चिक मज्जासंस्थेस चालना मिळते व त्या भागातील रक्ताभिसरण वाढते. व भावना नियंत्रित होतात.

sharadyogvigyan.blogspot.com

Thursday, 16 April 2020

योग विज्ञान योगासन भाग 1

योग विज्ञान शृंखला* 🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
योगासन भाग १
आसन म्हणजे सुखपूर्वक बसण्याची स्थिती असून योगासन   हा योगाभ्यासातील प्राथमिक भाग असून त्यामुळे प्राणिक आणि मानसिक शक्तीचा विकास होतो.व्यायाम केल्यानंतर येणारा थकवा,दम,घाम हे आसने केल्यावर अपेक्षित नाही. उलट आसनाने मनाला स्थिरता, शांती,विश्रांती मिळावी हा प्राथमिक उद्देश आहे.
   आसनाचे मुख्य दोन अंग आहेत. पहिला हालचालींचा गतिशील भाग   (dynamic aspect) तर दुसरा स्थिरतेचा भाग (static aspect) . हालचाल ही सावकाश,सहजतेने ,जोर न लावता करावी जेणे करून थकवा येणार नाही. ध्यानात्मक आसनामध्ये स्थिरतेला जास्त महत्व आहे. 
चलीत आसनामध्ये शक्तीशाली हालचाल असून शरिराची लवचिकता वाढते. तसेच रक्ताभिसरण व स्नायूंचा सांध्यावरील ताण वाढतो. शरीरातील प्राणिक अडथळे (energy blocks) निघून जातात. तसेच फुफ्फुसे, पचनसंस्था,उत्सर्जन संस्था समर्थवान व कुशल बनते. नवीन साधकांनी चलीत आसने केल्यास उपयोग होतो. उदा, सूर्यनमस्कार,चलीत पश्चिमोतासन,चलीत ताडासन,व चलीत हालासन.
     स्थिर आसने अनुभवी योगसाधकांनी करावीत. स्थिर आसनाचे आदर्श स्थितीमध्ये काही काळ स्थिर राहणे महत्वाचे आहे.स्थिर आसनांचा परिणाम प्राणिक व मानसिक शरीरावर दिसून येतो.याचा परिणाम शरीरांतर्गत अवयवावर जसे मेंदू,हृदय,फुफ्फुस,स्वादुपिंड यावर तर होतोच शिवाय मनावर परिणाम होत. मन शांत होते. मन आणि शरीर एकमेकास पूरक आहेत. ज्यावेळी शरीर स्थिर असेल त्यावेळी मन शांत असते. मन स्थिर नसेल किंवा चंचल असेल त्यावेळी शरीर स्थिर राहू शकत नाही. म्हणून शरीरास स्थिर करून मनाला शांत करता येते. त्याबरोबर भावनाही स्थिर होतात. 
शरीर हे द्वंदाचे परिणाम भोगत असते. मन व बुद्धीचा शरीराशी सतत सबंध असल्यामुळे ते द्वंदाचा विचार करतात.जेंव्हा मन आणि बुद्धी रममाण (attentive) असते त्यावेळी शरीरावर द्वंदाचा परिणाम होत नाही. म्हणून योगामध्ये स्थिरता,एकाग्रता व सजगता यास अनन्य साधारण महत्व आहे.
    हाडांच्या भोवती असणारे असंख्य स्नायू व लिगमेंट्स त्या दोन हाडामधील अंतर ठेवण्याचे काम करतात. त्यामुळे हालचालीच्या वेळी वेदना होत नाहीत. ह्या स्नायूंना कार्यक्षम राहण्यासाठी आसनांचा अभ्यास दिला आहे.आसनामध्ये स्नायूंचा तणाव , खिचाव व दबाव यांचा वापर होतो.त्यामुळे स्नायूंची कार्यक्षमता वाढते व शरीर सुस्थितीत ठेवण्यास मदत होते. 
योगासनामध्ये स्नायू स्थिर स्थितीत ताणले जातात व त्याची समलांबी ( isometric) हालचाल होते. ज्यामध्ये स्नायूंची लांबी कायम राहते, पण ताण ( Tone) बदलतो. या हालचालीत प्राणवायू कमी लागतो. 

sharadyogvigyan.blogspot.com







x

Sunday, 12 April 2020

योग विज्ञान ब्लॉग शृंखला

योग विज्ञान शृंखला* 🧘‍♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
           (कान,नाक,घसा तज्ञ)
मी व्यवसायाने कान,नाक,घसा तज्ञ असून योग शिक्षक ही आहे. अनेक वर्षांपासून मी स्वतः योगाभ्यास व योग शिकविण्याचे कार्य ही करीत आहे. योगातून मला सकारात्मक बदल दिसून आले. योगामुळे बरेचसे आजार ठीक होतात.उच्यरक्तचाप थायराइड,मायग्रेन,हृदयरोग,दमा,संधिवात सारखे रोग बरे होतात असे वाचले आहे व सांगितले ही जाते. सुरवातीस यावर विश्वास बसणे कठीण होते. हे कसे शक्य आहे? परंतु मी जस जसा योगाचा अभ्यास करीत गेलो तस तसा त्यावरील विश्वास दृढ होत गेला. अनेक संशोधनावरील पेपर व संदर्भ वाचले. त्यावरील निष्कर्ष वाचले. त्यावरून मनाची खात्री झाली की योग हे एक विज्ञान आहे.जगात अनेक ठिकाणी शोध चालू आहेत. त्याचे निष्कर्ष योगामध्ये सांगितल्याप्रमाणे सकारात्मक येत आहेत.
    योगाभ्यास करताना प्रत्येक शंकांचे वैज्ञानिक दृष्ट्या निरसन व समाधान होत गेले. म्हणून योग आणि विज्ञान यावर लिहिण्याचा मानस झाला.
  "योग विज्ञान" हे मी पुस्तक लिहीत असून माझी ही पहिलीच पोस्ट आहे. आपणास ही शृंखला आवडेल अशी अपेक्षा करतो.

sharadyogvigyan.blogspot.com